आपल्या भाषणातून अघटित मांडून खळबळजनक वातावरण निर्माण करण्यात शरद पवार यांचा कोणी हात धरणार नाही. आजवरचा त्यांचा प्रवास पाहता या जाणत्या राजाने आताही असेच काहीच्या बाही बोलून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जे वास्तवात नाही, किंवा नजीकच्या काळात घडणे अशक्य आहे, त्या विषयावर बोलून शरद पवारांनी पेल्यातील वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता कुणाला नको असते? शरद पवार तर सत्तापदापासून फार काळ दूर राहू शकत नाहीत, असाच त्यांचा आजवरचा इतिहास आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे महाराष्ट्राने याआधी अनेक वेळा अनुभवले आहे. आताची भाषणे ही अशाच सत्तेच्या स्वप्नाचा खयाली पुलाव आहे, असे म्हणायला हरकत नाही.
एका मुलाखतीच्या दरम्यान शरद पवार म्हणाले की ''भाजपा हा गुंडांना पवित्र करून घेणारा पक्ष आहे.'' आपल्या विरोधकांवर अशा प्रकारची टीका केली पाहिजे किंवा अशी टीका राजकारणात क्षम्य आहे असे म्हटले, तरी प्रश्न उरतो की भाजपात आलेले हे गुंड आधी कुणाच्या पक्षात होते? या गुंडापुंडांचा शिलेदार कोण? आजवर या गुंडांना कुणी पोसले होते? असे अनेक प्रश्न शरद पवारांचे वरील वाक्य ऐकताना अनेकांच्या मनात उभे राहिले असतील. राजकारणात गुंडांना मुक्त प्रवेश कुणी दिला आणि कुणाच्या छत्रछायेत संघटित गुन्हेगारी करणारे गुंड सत्ताधाऱ्यांच्या आसपास वावरू लागले? याचा शोध शरद पवार यांनी घेतला असता, तर अशा प्रकारे टाळयाखाऊ विधान करण्यास ते धजावले नसते. नव्वदच्या दशकात महाराष्ट्रातील जागोजागीचे गुंड राजकीय क्षेत्रात डेरेदाखल झाले. काही टाडावीरांनी तर शरद पवारांबरोबर शासनाच्या विमानाने हवाई सफरही केली होती, हे शरद पवार विसरले असले तरी महाराष्ट्र विसरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरचा आजवरचा विस्तार शरद पवार यांनी केवळ राजकीय बळावर केलेला नाही. त्या विस्तारात जागोजागची मसल पॉवर मुबलक प्रमाणात वापरली गेली आहे. असे असताना मग पवार कशाच्या आधारावर भाजपावर टीका करत आहेत? याला शरद पवारांची 'सिलेक्टिव्ह विस्मृती' म्हणायचे काय?राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रचाराचा ज्वर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणांतून मतदारांचे मनोरंजनही होते आहे आणि आपण कुणाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे याची जाणीवही होते. पश्चिम महाराष्ट्रापुरते अस्तित्व उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मागील काही दिवसांतील वक्तव्ये ही त्यांच्या मनात साचलेली मळमळ व्यक्त करणारी आणि त्यांची सत्तेची अभिलाषा स्पष्ट करणारी आहेत. शरद पवार हे फार काळ सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी त्यांची स्थिती होत असते. मग ते वाटेल तशी तडजोड करून सत्तेत येतात, हा अनुभव उभ्या महाराष्ट्राला आहे. मात्र अशा कोलांटया उडया मारताना ते समाजहिताचा, राज्यहिताचा आणि राष्ट्रहिताचा बेगडी मुखवटा चढवतात. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान त्यांनी ''महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार'' असे भाकित केले. ''भाजपा-सेना युती तुटली आहे. आता शिवसेना भाजपाचा पाठिंबा काढून घेईल. आम्हीही भाजपाला पाठिंबा देणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी उत्सुक आहोत'' असे वक्तव्य केले. सध्या भाजपा-सेना संबंध ताणलेले आहेत. उध्दव ठाकरेंनी युती तोडली असली, तरी त्यांचा पक्ष अजून सत्तेतून बाहेर पडला नाही आणि पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत तरी सेना सत्तेतून बाहेर पडेल अशी शक्यता नाही. पण शरद पवार हे सुप्रसिध्द होराभूषण आहेत. त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीचा होरा मांडला आहे. काहीही करून सेनेने सत्तेतून बाहेर पडून भाजपाचा पाठिंबा काढावा, यासाठी पवार प्रयत्न करतील. आपल्या सूचक वक्तव्यातून ''पाठिंबा काढा, मग आपण सत्तेत येऊ'' असे सेनेला सांगत आहेत. कदाचित 'राकाँशि' हा नवा प्रयोगही आतापर्यंत त्यांच्या डोक्यात शिजला असेल. कारण त्यांना सत्तेचे डोहाळे लागले आहेत. यदाकदाचित मध्यावधी निवडणुका झाल्या, तर पुन्हा नव्याने सत्तेत सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल, अशी आशा मनात ठेवून शरद पवार महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असा अंदाज बांधत आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली, तर पवारांच्याच पक्षातील काही आमदार भाजपाच्या तंबूत आपल्या वळकटया टाकायला मागेपुढे पाहणार नाहीत. कारण जनतेला स्थिर सरकार हवे आहे, विकासाभिमुख सरकार हवे आहे, तर निवडून आलेल्या सर्वपक्षीय आमदारांना मध्यावधी निवडणूक नको आहे. आपला पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांना पूर्ण करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सरकार स्थिर असून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगत आहेत. मग पवार कशाच्या आधारावर मध्यावधीचा होरा मांडत आहेत? पवारांना आता सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत, त्यामुळे ते असे बोलत आहेत का?
निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप होणारच. पण त्याला काहीतरी आधार असावा. आपण केलेला आरोप आपल्यावरच मुद्देमालासह उलटू शकतो, याची जाणीव शरद पवार यांना नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मग असे असताना शरद पवार अशा प्रकारचे बेफाम आरोप का करत आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे - सत्तेची अभिलाषा आणि तिच्या प्राप्तीसाठीची ही तळमळ आहे. या तळमळीपोटी शरद पवार असे बोलत आहेत. आपल्या बोलण्याचा काही परिणाम झाला आणि आपल्या बहकाव्यात येऊन सेनेने पाठिंबा काढला, तर शरद पवारांना हवेच आहे. कारण त्यामुळे ते सत्तेत सहभागी होऊ शकतात. आपली ही राजकीय अटकळ प्रत्यक्षात यावी, यासाठी पुढील काही दिवस ते अशाच प्रकारची आदळआपट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शरद पवार यांनी एका ठिकाणी म्हटले की मराठा मूक मोर्चांच्या आयोजनापाठीमागे भाजपाचा हात आहे. शरद पवार यांचा हा आरोप म्हणजे 93 सालच्या तेराव्या बाँबस्फोटासारखी मनगढत कहाणी आहे किंवा वास्तवाची जाणीव नसलेल्या पण स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या पुढाऱ्याचे स्वप्नरंजन आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत आयोजित झालेले मराठा मूक मोर्चे हे मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी मराठा समाजाने काढले होते आणि सर्वपक्षीय मराठा नेत्यांना मोर्चांपासून दूर ठेवले होते. असे वास्तव असताना मोर्चांच्या आयोजनामागे भाजपा आहे, असे म्हणून शरद पवार मराठा समाजाच्या संघटनशक्तीचा अपमान तर करत नाहीत? आपल्या प्रदीर्घ सत्ताकाळात मराठयांचे जे प्रश्न पवारांनी कुजवत ठेवले, तेच प्रश्न घेऊन मराठयांचे मोर्चे निघाले होते, एवढे तरी भान शरद पवार यांनी ठेवायला हवे होते. आण्ाि दुसरे म्हणजे बारामतीतही मराठा मूक मोर्चाचे आयोजन झाले होते. पवारांच्या या होम पीचवर झालेल्या मोर्चात पवाराचे पुतणे अजित पवार सहभागी झाले होते. याचा अर्थ असा समजायचा का, की अजित पवार आता भाजपाच्या हातचे बाहुले झाले आहेत असे शरद पवार यांना म्हणायचे आहे? जागोजागी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, आमदार, खासदार मराठा मोर्चांत सहभागी झाले होते. हे सर्व जण भाजपाचे पुरस्कर्ते आहेत असे पवारांना म्हणायचे आहे का?
मराठा मोर्चांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामाजिक असंतोष निर्माण होईल आणि या असंतोषाला आपण राजकीय-सामाजिक अराजकात बदलू आणि त्यावर आपण आपली राजकीय पोळी भाजून घेऊ अशी योजना कदाचित पवारांनी केली असावी. पण मराठा समाजाने आपल्या वर्तनाने ही योजना नाकारली. कारण पवार नावाच्या जाणत्या राजावरचा समाजाचा विश्वास आता उडाला आहे. मराठा विरुध्द दलित अशी उभी सामाजिक फाळणी झाली असती, तर पवारांच्या हाती आयतेच कोलित मिळाले असते. प्रत्यक्षात मात्र भाजपाने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा मोर्चाचा विषय मोठया कौशल्याने हाताळला. राज्यभर इतके मोर्चे निघूनही कोठेही अनुचित प्रकार न झाल्यामुळे पवारांना राजकारण करण्याची संधी मिळाली नाही. त्याची मळमळ या प्रचारसभांतून शरद पवार बाहेर काढत आहेत.
मराठा समाजाने ज्या प्रश्नांसाठी मोर्चे काढले, ते प्रश्न 2014नंतर उत्पन्न झालेले नाहीत. मागील काही दशकांपासून मराठा समाज या प्रश्नांसाठी झगडत आहे. या दशकात काही काळ स्वतः शरद पवारच राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजाला नेहमीच गृहीत धरले, मतांचे राजकारण केले, पण त्यांचे प्रश्न कधीच सोडवले नाहीत. उलट देवेंद्र फडणवीस मतपेढीचा विचार न करता प्रामाणिकपणे मराठयांचे प्रश्न सोडवू पाहत आहेत. गेल्या पन्नास वर्षांत न केलेला मूलभूत विचार करून भाजपाचे सरकार मराठा समाजाचा विषय हाताळत आहे आणि लवकरच त्यांचे परिणाम दिसू लागतील. शरद पवारांचा पोटशूळ हाच आहे. मराठा मोर्चांना फडणवीसांनी यशस्वीपणे हाताळले. अनेक बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले. भविष्यात या निर्णयांचा मराठा समाजाला फायदाच होणार आहे, त्यामुळे मराठा समाज खूप मोठया प्रमाणात भाजपाकडे वळत आहे. इतके दिवस ज्यांच्या जोरावर सत्तेची फळे चाखली, तोच समाज आता दूर होत आहे याचे दुःख शरद पवारांना होत असेल का? आणि या दुःखामुळे मनःस्वास्थ्य ढासळून ते काहीच्या बाही बोलत असतील का?
शरद पवारांचा आजवरचा राजकीय प्रवास आणि महत्त्वाकांक्षा पाहता ते सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. सत्तेसाठी त्यांनी काँग्रेस सोडली आणि पुलोद काढली. मुख्यमंत्री झाले. पण पुलोदचे कडबोळे फार काळ टिकले नाही. सत्ता जाताच पुन्हा त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला. राजीव गांधींनंतर काँग्रेसचे सर्वेसर्वा होण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. विदेशी नेतृत्वाचा मुद्दा करून त्यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 1999 साली सत्ता मिळते असे पाहून ज्यांच्याशी फारकत घेतली त्या काँग्रेससोबत युती केली. 2014पर्यंत सत्तेची ऊब चाखली. 2014 साली भाजपाला बहुमत मिळते आहे असे लक्षात येताच भाजपाने न मागताच पवारांनी पाठिंबा जाहीर करून टाकला. अपेक्षा ही की सत्तेत सहभागी होता यावे. अर्थात भाजपाने तो पाठिंबा नाकारला आणि पवारांचे सत्तेचे स्वप्न भंगले. महानगरपालिका निवडणुकांचे आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील जागावाटपाचे निमित्त करून उध्दव ठाकरे यांनी युती तुटल्याचे जाहीर केले. यावर होराभूषण शरद पवार यांनी भाष्य केले की, 'महाराष्ट्रातील भाजपा-सेनेचे सरकार गडगडणार, सेना पाठिंबा काढून घेणार. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या युतीचे सरकार येणार.' शरद पवार यांचे हे भाष्य म्हणजे सत्तेचे डोहाळे लागल्यावर होणारी मळमळ आहे. फरक फक्त एवढाच आहे की ही मळमळ द्वेषावर आधारित आहे.
9594961860