ब्ल्यूटूथ हिअरिंग एड तंत्रज्ञानाचे जसे चांगले परिणाम आहेत तसे वाईटदेखील आहेत. सध्या या यंत्राचा मोठया प्रमाणात वापर होत असतो. या लेखात आपण ब्ल्यूटूथ तंत्रज्ञान आणि श्रवण साहाय्यक यांत ब्ल्यूटूथच्या वापराबाबत माहिती जाणून घेऊ या.
मित्रांनो, दर आठवडयाला तंत्रज्ञानाबाबत नवनवीन माहितीच्या स्वरूपात आपली भेट होत आहेच. फोनच्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया मिळाल्यानंतर फार आनंद वाटतो, त्याचबरोबर नवीन लिहिण्याची प्रेरणादेखील मिळत असते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत या आठवडयात आपण जाणून घेणार आहोत ब्ल्यूटूथ श्रवण साहाय्यक अर्थात ब्ल्यूटूथ हिअरिंग एडबद्दल. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर म्हणजे काय असतो, हे आपल्याला ब्ल्यूटूथ हिअरिंग एडच्या माध्यमातून लक्षात येईल.
तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून समाजातील एखाद्या घटकाच्या समस्येवर काढलेला तोडगा म्हणजेच ब्ल्यूटूथ हिअरिंग एड. ज्या लोकांना कमी ऐकू येण्याचा आजार आहे अशांसाठी ब्ल्यूटूथ हिअरिंग एड हे उपकरण तयार केले गेले आहे. श्रवणयंत्राला ब्ल्यूटूथची जोड दिल्यामुळे कृत्रिम श्रवण पध्दतीत क्र ांतिकारक परिणाम घडू शकला आहे. हिअरिंग एड उपकरण अशा सर्वांसाठी जणू वरदान ठरले आहे.
ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाबद्दल
ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाबद्दल आपण सर्व जण परिचित आहात. जवळपास सर्व मोबाइल फोन यूजर्स ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. दोन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील संवादाचे माध्यम आहे ब्ल्यूटूथ. हे एक प्रकारचे वायरलेस तंत्रज्ञान आहे. रेडिओ ध्वनिलहरींमध्ये उच्च वारंवारता (फ्रि क्वेन्सी) जोडून या माध्यमातून माहिती आदान-प्रदान करता येते. शिवाय यात कुठल्याही सुरक्षिततेची फिकीर नसते. मोबाइल फोन, कॉम्प्युटर, टी.व्ही. तसेच इतर उपकरणांना या माध्यमातून सहज जोडता येते.
श्रवण साहाय्यकात ब्लूटूथचा वापर
ब्लूटूथसारख्या प्रसिध्द वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करून ब्लूटूथ हिअरिंग एड विकसित केले गेले. जुन्या पध्दतीच्या श्रवण साहाय्यकात केवळ आसपासचा आवाज ऐकू येण्याची तरतूद होती. मात्र फोनसंवाद, मोबाइल, कॉम्प्युटर, संगीत यातील नवनवीन उपकरणाद्वारे आवाज ऐकण्याच्या मर्यादा ब्ल्यूटूथ हिअरिंग एडच्या माध्यमातून संपल्या आहेत. या माध्यमातून टी.व्ही., स्मार्ट फोन, कॉम्प्युटर इत्यादी उपकरणातील ध्वनी पकडणे सहज शक्य आहे.
ब्ल्यूटूथ हिअरिंग एड हे अनेक उपकरणांशी जोडता येऊ शकते. त्याचबरोबर इतर आवाज ऐकू येण्यासाठी मायक्रोफोनदेखील उपयुक्त ठरतो. मायक्रोफोनच्या माध्यमातून बाहेरील आवाज यात कॅप्चर होत असतो. अशा वेळी खिशाला, शर्टला किंवा नेकलेसच्या माध्यमातूनदेखील मायक्रोफोन बाळगण्याची सुविधा आज बाजारपेठेत उपलब्ध आहे. जेव्हा मुंबईसारख्या प्रचंड गर्दी असलेल्या शहरात एखादी अशी व्यक्ती फिरते जिची श्रवणक्षमता कमी आहे, अशा वेळी मायक्रोफोन असलेले ब्ल्यूटूथ हिअरिंग एड बरोबर बाळगल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. अशा वेळेला स्टेशनवरील येणाऱ्या गाडीची अनाउन्समेंट असो अथवा लोकलमधील स्टेशनचे नाव पुकारणारी माहिती असो, अगदी कुणाचेही साहाय्य न घेता कळण्यासारखी होते. त्याचबरोबर एकाच वेळी स्मार्ट फोनलादेखील कनेक्ट करता येत असल्यामुळे मोबाइल संभाषण करता येईल व इतर ऑॅडिओ सुविधांचा लाभ घेता येईल. थोडक्यात - कुणीही दिव्यांग व्यक्ती परावलंबी असणार नाही.
ब्लूटूथ हिअरिंग एडबद्दल अनेक शास्त्रज्ञांनी तसेच तज्ज्ञ व्यक्तींनी समाधान व्यक्त केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातून मेडिकल क्षेत्रासाठी तयार केलेले प्रभावी उपकरण म्हणून आज याची ओळख बनली आहे. या माध्यमातून अनेकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी मदत मिळू शकली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्त समाज उभा करणे म्हणजे त्यातील कमजोर घटकालादेखील सशक्त करणे हा सिध्दान्त ब्ल्यूटूथ हिअरिंग एडने प्रत्यक्षपणे सिध्द करून दाखवला आहे.
9579559645