ऋतुसंहार हे खंडकाव्य तर निसर्गाचा एक सौंदर्यपटच उलगडून सांगणारे आहे. सहा ऋतूंचे सहा सर्ग, प्रत्येक सर्गात सोळापासून अठ्ठावीसपर्यंत श्लोक आहेत. कालिदासाच्या प्रतिभेचे एक विशेष वेगळेपण ऋतुसंहारमध्ये लक्षात येते, ते म्हणजे या काव्यात नायक, नायिका नाहीत. निसर्ग हा स्वत:च या काव्याचा नायक आहे. कालिदासाचे पहिले खंडकाव्य 'ऋतुसंहारम्' तसे थोडेसे दुर्लक्षितच राहिले आहे असे म्हणावे लागेल. आनंदी, खेळकर तरीही सूक्ष्म, मार्मिक अशा लेखनशैलीतून या भरतभूमीतील एका समृध्द संस्कृतीचे, अभिजात कलाविलासाचे दालन कालिदास आपल्यासमोर उघडून देतात. म्हणूनच 'कालिदास' हे भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक विशेषनाम होते!
करडया आकाशात काळया मेघांनी प्रवेश केला, सोसाटयाचा वारा वाहू लागला... धुळीच्या वावटळी गिरक्या घेऊ लागल्या... मधूनच वीजबाई लखकन चमकू लागल्या... ढगांनाही गडगडाट करून आपल्या अस्तित्वाची दखल साऱ्या सृष्टीला देण्याची खुमखुमी येऊ लागली की, सृष्टीतही विविध बदल होऊ लागतात. ग्रीष्माने पोळलेल्या वनस्पतींना, प्राणिमात्रांना, तृषार्त भूमीला, कोरडया पडलेल्या नद्या, ओहोळांना... सर्वांनाच एका विलक्षण चैतन्याची ओढ लागते. साऱ्या नभाला काळे मेघ आक्रमून टाकतात. आणि मग...
'सजल शाम घन गर्जत आले,
बरसत आज तुषार
आता जीवनमय संसार!
असे वर्षा ऋतूचे स्वागत होते. मग पावसाच्याच गोष्टी! वृत्तपत्रांच्या पुरवण्या, मासिके, पाक्षिके यांनाही पाऊस हाकारू लागतो. शेतकऱ्यांचा तर तो प्रिय परमेश्वरच!
आणि साहित्यप्रेमींना आठवण होते ती महाकवी कालिदासाच्या 'मेघदूताची'!
कविकुलगुरू कालिदासाने रचलेली, ती त्या विरही यक्षाची अमर विरहकहाणी, मेघाकरवी आपल्या प्राणप्रिय पत्नीला पाठवलेला निरोप... त्या मेघाला केलेल्या प्रवासाचे मार्गदर्शन, वाटेत भेटणाऱ्या पर्वतराजी, वृक्ष, वेली, नद्या, ओहोळ यांचे रम्य वर्णन!
रसिक वाचक, लेखक मेघदूताच्या प्रेमातच पडतात. मान्यवर कवींनी आजवर मेघदूताचे अनेक पद्यमय अनुवाद केलेले आहेत. काही उत्साही निसर्गप्रेमींनी तर त्या मेघाला वाटाडया करून तसाच प्रवास करण्याचा यशस्वी प्रयत्नही केला आहे. अनेकांनी ते गेय स्वरूपात सादर केले, त्यावर आधारित नृत्याविष्कार, नाटयाविष्कार सादर केले. चित्रकारांनी त्यासाठी रेखाटने केली.
असे भरभरून यश मिळालेल्या मेघदूताच्या मानाने कालिदासाचे पहिले खंडकाव्य 'ऋतुसंहारम्' तसे थोडेसे दुर्लक्षितच राहिले आहे असे म्हणावे लागेल. तशी महाकवी कालिदासविरचित प्रसिध्द काव्ये म्हणजे 'ऋतुसंहारम्' हे निसर्गवर्णनपर खंडकाव्य, मेघदूत हे खंडकाव्य, 'कुमारसंभव' व 'रघुवंश' ही महाकाव्ये.
या सर्वात 'ऋतुसंहार' हे त्यांचे सुरुवातीचे पहिले खंडकाव्य मानले जाते. सहा ऋतूंची वर्णने करणारे हे काव्य सहा सर्गात रचिले आहे. काव्याची रचना रसानुरूप वेगवेगळया वृत्तांत आहे. वंशस्थ, वसंततिलका, मालिनी, उपजाति अशा अनेक वृत्तांचा उपयोग कौशल्याने केला आहे. निसर्गाशी एकतानता साधणारे हे काव्य आहे.
कालिदास हा संस्कृत भाषेतला महाकवी, नाटककार. परंतु त्याच्या अत्यंत रसाळ अशा साहित्यकृतीमध्ये त्याने स्वत:विषयी कुठेच काही लिहून ठेवलेले नाही. तो ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात होऊन गेला. उज्जयिनी... मध्य प्रदेशातील राजा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी तो एक होता. बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश, काश्मीर या चारही प्रदेशांत त्याचे वास्तव्य असावे. त्याच्या असामान्य प्रतिभेमुळे त्या त्या प्रदेशातले लोक असा दावा करतात. एक गोष्ट मात्र नक्की स्वीकारावी लागते, ती म्हणजे त्याचा जन्म पहाडी प्रदेशात झाला असावा आणि त्याला हिमालयाचे विलक्षण आकर्षण होते. त्याने जाणीवपूर्वक बराच प्रवास केला असणार, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, मार्मिक अवलोकन... आंतरिक निसर्गप्रेम आणि त्याला मिळालेली रसिकतेची आणि विद्वत्तेची जोड यांचा मनोज्ञ संगम कालिदासाच्या सर्व साहित्यकृतीत प्रत्ययाला येतो. हिमालयाला तर तो 'देवातात्मा नागधिप:।' 'अनन्त रत्नप्रभव:' म्हणतो. मेघदूतात, मेघाला मार्ग सांगण्याच्या मिषाने त्याने मध्य प्रदेशातील उज्जयिनीचे आत्मीयतेने वर्णन केले आहे. ऋतुसंहार हे खंडकाव्य तर निसर्गाचा एक सौंदर्यपटच उलगडून सांगणारे आहे. सहा ऋतूंचे सहा सर्ग, प्रत्येक सर्गात सोळापासून अठ्ठावीसपर्यंत श्लोक आहेत.
प्रत्येत ऋतूतील वृक्षवेलींवर, पशुपक्ष्यांवर, वातावरणावर, स्त्री-पुरुषांच्या चित्तवृत्तींवर होणारे परिणाम ऋतुसंहारमध्ये अचूक टिपले आहेत. त्याच्या नैसर्गिक शास्त्राभ्यासाची, कलापरिचयाची, सूक्ष्म अवलोकनाची जोड श्लोकाश्लोकात मिळालेली लक्षात येते. यात त्याचे बुध्दिवैभवही प्रत्ययाला येते.
कालिदासाच्या प्रतिभेचे एक विशेष वेगळेपण ऋतुसंहारमध्ये लक्षात येते, ते म्हणजे या काव्यात नायक, नायिका नाहीत. निसर्ग हा स्वत:च या काव्याचा नायक आहे. विविध ऋतूंतील सारी सृष्टीच त्या त्या रूपात नायकस्थानी येते. निसर्गाची ही बदलती, विविध रूपे, चर-अचर सृष्टीवर त्यांचा होणारा परिणाम, आभाळ, नद्या, पशुपक्षी, वृक्षवेली यांचे सूक्ष्म निरीक्षण, सुरस वर्णन हे सर्व सर्गांचे मर्म आहे.
ते काही आजच्यासारखे 'धम्माल' करीत केलेले पर्यटन वा फोटोसेशन, सेल्फींसाठी केलेले चित्रण वा नेटवरच्या माहितीवरून लिहिलेले प्रवासवर्णन नाही. आपल्या वास्तव्यातील सभोवताल, सर्व सृष्टी कालिदासाने अगदी सजगपणे अनुभवली होती. चाळीसहून अधिक वनस्पती, फुले, वृक्ष यांची ओळख या काव्यात येते. विशेष म्हणजे ऋतुसंहारचा प्रारंभ, वर्षारंभाची सुरुवात करणाऱ्या ऋतुराज वसंताने होत नाही, तर तो 'ग्रीष्म' ऋतूने होतो. अर्थात त्याचा शेवटही शिशिर ऋतूने होत नाही, तो 'वसंत' ऋतूने होतो. आपल्या काव्याचा शेवट सुखद, आनंदात व्हावा असा कदाचित त्याचा मानस असावा. या ऋतूंच्या वर्णनातही 'शृंगार'रसात जास्त रमणारी त्याची प्रतिभा, तिचे मनमोहक आविष्कार करण्यात तो कसूर करीत नाही.
सुरुवात तिथूनच होते -
प्रचण्ड सूर्य: स्पृहणीय चन्द्रमा:
सदावगाहक्षमवारिसञ्चय: ।
दिनान्तरम्योऽभ्युपशान्त मन्मथ: ।
निदाघकालोऽयमुपागत: प्रिये ॥
प्रिये, हा ग्रीष्म ऋतू आला आहे. या ऋतूत सूर्य प्रखर, उष्ण असतो. नित्य स्नान करण्यास पुरेसे पाणी जलाशयात असते. सायंकाल रम्य असतो. मन्मथ-मदन शांत झालेला असतो.
ही उन्हाळयाची सुरुवात आहे. तसे लोक सजग झाले आहेत. चंद्रप्रकाशात कुठे कारंजे असलेल्या घरात वेगवेगळी रत्ने धारण करून, चंदनाचे गंध लावून लोक ग्रीष्म ऋतूचा आनंद उपभोगत आहेत.
सुवासितं हर्म्यतल मनोहरं ।
प्रियामुखोच्छ्वासविकम्पितं मधु ।
सुतान्त्रिगीतं मदनस दीपनं ।
शुचौ निशीशेऽनुभन्ति कामिन: ।
या ग्रीष्म ऋतूत कामी जन मध्यरात्री घराच्या सौधांवर प्रियेच्या मुखाच्या उच्छ्वासाने उसळणारे मद्य पिऊन, वीणावादनाने काम उद्दीपित करणाऱ्या गोड संगीताचा आस्वाद घेतात.
स्त्रिया आपल्या गोलाकार नितंबांवर सुवस्त्रे नेसून, मेखला बांधून, स्तनांना चंदनगंध लावून, हार अलंकारांनी भूषवून, स्नानसमयी सुगंधित द्रव्ये लावून कामी जनांचा ग्रीष्म शांत करतात. लाल लाक्षारसाने पावले रंगवतात... मंजुळ नादाची पैंजणें घालतात. घामाने अंग निथळल्यामुळे जाड वस्त्रे त्यागून, तलम, मुलायम वस्त्रांनी अंगे झाकतात.
चंदनमिश्रित पाणी पंख्याच्या वाऱ्याने शिंपडले जाते. झोप न येणाऱ्या रात्री वीणावाद्ययुक्त मधुर गीतांनी जागत्या ठेवल्या जातात.
उन्हाळा सुसह्य करण्याच्या या साऱ्या क्लृप्त्या 'शहाणी' माणसे करू शकतात, पण बाकी वातावरणाचे काय? त्याचे वर्णन करताना कालिदास लिहितात -
असत्य वातोध्दतरेणुमण्डला
प्रचण्ड सूर्यातपतापिता मही ।
न शक्य द्रष्टुमपि प्रवासिभि:
प्रियावियोगानल दग्धमानसै: ॥
घरापासून दूर राहणारे लोक, प्रियतमेच्या विरहाने चित्त पोळलेले प्रवासी! त्यांना जोरदार वाऱ्याने धुळीचे लोट उसळणारी, सूर्याच्या प्रखर उष्णतेने तापलेली पृथ्वी पाहणेही शक्य होत नाहीये. उन्हात बाहेर बघवतही नाही. ही झाली प्रवाशांची गोष्ट. परंतु उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून आपण आज एसी वाढवू. शीतपेयांचा उपयोग करू. कालिदासाच्या काळी कोणते उपाय योजले जात होते? तर स्त्रियांनी घरांच्या सौधावर निद्रा घेणे पसंत केले होते. अत्यंत तलम वस्त्रे परिधान केली होती. स्नान करून अंगाला चंदनाचा लेप लावला होता. केसांना सुगंधी द्रव्ये लावली होती. कुठे सुगंधी कारंजी तर कुठे शीतलता देणारी रत्ने यांचा उपयोग केला होता. पंख्यांच्या वाऱ्याने सुगंधी जल शिंपले जात होते. जळजळीत उन्हापासून बचाव करण्यासाठी त्या वेळच्या माणसांनी योजलेले हे त्या काळचे उपाय! वेगळे आणि नैसर्गिक! पहिल्या दहा श्लोकांत माणसांवर झालेला ग्रीष्म ऋतूचा परिणाम सांगून झाल्यावर कालिदास मानवेतर प्राण्यांवर ग्रीष्माचा काय परिणाम होतो, ते आपला बचाव करण्याचा कसा प्रयत्न करतात याचे वर्णन करतो.
पहिल्या सर्गाच्या अकराव्या श्लोकांकडे पाहा -
मृगा: प्रचण्डातपिता भ्रृशं
तृषामहत्या परिशुष्क तालव: ।
वनान्तरे तोयमिति प्रधापिता
निरीक्ष्य भिन्नञ्जनसन्निभं नभ: ॥
प्रखर उष्म्याने अतिशय तापून, तहानेने टाळा (कंठ) कोरडा पडलेले हरीण, चूर्ण केलेल्या निळसर अंजनाप्रमाणे दिसणारे आकाश पाहून, दुसऱ्या वनात पाणी असेल असे समजून धावत आहे. आपण ज्याला 'मृगजळ' म्हणतो, तेच त्यांना समोर दिसत आहे. आणि त्या पाण्याच्या आभासी रूपाला भुलून हरणे धावत आहेत.
निसर्गातली विलक्षण वाटावी अशी अनेक वर्णने या ग्रीष्म ऋतूच्या सर्गात येतात.
तप्त धुळीच्या फुफाटयाने अतिशय तापलेला, अधोमुख होऊन वारंवार फूत्कार करणारा साप, आपली कुटिल गती सोडून मोराच्या पिसाऱ्याखाली शांतपणे विश्रांती घेतो आहे. प्रखर उन्हाने शुष्क कंठ झाल्यामुळे तहानेने व्याकूळ झालेले हत्ती, सिंहालादेखील भीत नाहीत. (श्लोक 15). सूर्याच्या दाहक किरणांनी शरीरातील व मनातील शक्ती क्षीण झालेले मोर आपल्या गोलाकार पिसाऱ्याच्या छायेत मुख टेकलेल्या सर्पांनाही मारीत नाहीत.
या उन्हाळयाची दाहकता एवढी तीव्र झाली आहे की, प्राणी आपले जन्मजात स्वभावही विसरून गेले आहेत. आपणही उन्हाळयात किती गळून जातो... आणि किती गोष्टी 'जाऊ देत' म्हणून सोडून देतो! कुठल्या हल्ल्याचे वा प्रतिकाराचे त्राणच राहत नाही.
सभद्रमुस्तं परिशुष्ककर्दमं ।
सर: खनन्नायतपोतृमण्डलै: ।
खेर्रमयूखैरभितापितो भृशं
वराहयूथो विशतीव भूतलम् ॥
कालिदासाची निसर्गाशी जवळीक आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती सांगणारा हा एक श्लोक.
नागरमोथा असणारी, चिखल कोरडा पडलेली सरोवरे आपल्या विस्तीर्ण मुखांनी खणणारे डुकरांचे कळप जणू काही सूर्याच्या प्रखर किरणांनी त्रासून उष्णता शमवण्यासाठी भूमीत शिरत आहेत.
हे दृश्य आजही पाहायला मिळते. उन्हाळयात आमच्या घराभोवतीच्या बागेत झाडांच्या अळयातील माती उकरून उकरून भटके कुत्रे त्यात पडून राहतात. पुढच्या काही श्लोकांत उष्णतेपासून बचाव करण्याचा या प्राणिसृष्टीचा प्रयत्न आणि त्यात विसरून गेलेला त्याचा मूळ स्वभाव इथे वर्णन केला आहे.
तापलेले बेडूक चिखलपाण्यातून उडी मारून तहानेल्या सापाच्या फणारूपी छत्राखाली छायेसाठी निवास करीत आहेत. हत्तींनी कमळांचे ताटवे उखडून टाकले आहेत. मासे भयभीत झाले आहेत. सारस पक्षी उडून गेले आहेत. चिखलाचा विध्वंस झाला आहे आणि पाण्याची फार आवड असणाऱ्या म्हशी फेसाने भरलेली तोंडे विस्फारून, लाल जिभा बाहेर काढून, तोंडे वर करून, तहानेने व्याकूळ झालेले त्यांचे कळप पाण्याचा शोध घेत पर्वतांच्या गुहातून बाहेर पडत आहेत.
यांसारखी वर्णने वाचली की केवळ शृंगाररसात न रमता कालिदास सभोवतालच्या सृष्टीची, प्राण्यांची, त्यांच्या शारीरक्रियांची निरीक्षणे किती अचूक आणि सूक्ष्मपणे करतो याचे विशेष वाटते.
उन्हाळयाची दाहकता अधिक भयंकर करणारी गोष्ट म्हणजे 'वणवे'. आजही आपल्याला उन्हाळयात अनेक ठिकाणी वणव्यांना सामोरे जावे लागते. जंगले जळून खाक होतात. अपरिमित नुकसान होते.
'ऋतुसंहार'मध्ये पहिल्या सर्गात बावीसपासून पुढच्या श्लोकांत या वणव्यांचीच दाहक वर्णने आहेत. त्या काळी तर जंगले आजच्यापेक्षा खूप दाट होती... वणव्यांची व्याप्ती कितीतरी जास्त असणार!
विकचनवकुसुम्थस्वच्छ सिन्दूरभासा
प्रबलपवनवेगोभ्दूतवेगेन तूर्णम् ।
तटाविटपलताग्रालिङ्ग न व्याकुलेत
दिशि दिशि परिदग्धा भूमय: पावकेन ॥ 24 ॥
नवीन कुसुंभाप्रमाणे लाल, वेगवान वाऱ्यामुळे तटवर्ती भागातील वृक्षवेलींच्या अग्रभागांना आलिंगन देण्यास अधिर अशा अग्नीने सर्व दिशांनी भूमीला दग्ध केले आहे.
दावानल वाऱ्याने वाढून पर्वतांच्या दऱ्याखोऱ्या जाळत आहे. वाळलेल्या कळकाच्या बनात मोठा आवाज करून, क्षणात मोठा होऊन वणवा गवतात पसरत आहे. वनातील हरणांच्या कळपांना भयभीत करीत आहे.
शाल्मली वृक्षांच्या वनात एकवटून, झाडांच्या ढोलीत सुवर्णाप्रमाणे तेजस्वी दिसणारा, पिकलेली पाने असलेल्या फांद्यांचे वृक्ष हलवून, वाऱ्याने उसळलेला अग्नी वनामध्ये सर्वत्र पसरत आहे. वाऱ्याच्या झोतात अग्नीच्या ज्वाला आधी वृक्षांच्या पानांना, शेंडयांना वेढतात.
गजगवयमृगेन्द्रा वहिनसंतप्त देहा:
सुहृद इव समेता द्वद्वभावं विहाय ।
हुतवहपरिखेदादाशु निर्गत्य कक्षा,
द्विपुल पुलिन देशान्निम्नगां संविशन्ति ॥
अग्नीमुळे शरीरे तप्त झालेले हत्ती, गवे, सिंह वैरभाव सोडून जणू काही मित्राप्रमाणे एकत्र येऊन उन्हाने, अग्नीने त्रासल्यामुळे विस्तीर्ण वालुकामय प्रदेश सोडून त्वरेने नदीपात्रात प्रवेश करीत आहेत.
वणव्यांची अशी वर्णने काल्पनिक नाहीत. कालिदासाने आपल्या सभोवतीच्या निसर्गाचा, ऋतूनुसार त्यावर होणारा परिणामांचा सजगतेने अभ्यास केलेला आहे. कोणाही लेखकाला, कवीला आपल्या वर्ण्यविषयांची सांगोपांग माहिती असावी लागते. अभ्यास असावा लागतो. वर्ण्य घटना अनुभवलेल्या असाव्या लागतात. तेव्हाच ती वर्णने परिपूर्ण होतात.
काही श्लोकात अशा वणव्यांना कविराजांची प्रतिभा साक्षी असल्याचे मनोमन पटते. भयंकर वणव्याने धान्यांचे कोंब जळले आहेत. सुकलेली पाने वाऱ्याने उंच उडत आहेत. प्रखर उष्णतेने पाणी आटून गेले आहे. सर्व वनप्रदेश अतिशय भयाण दिसत आहे.
साऱ्यांच्याच जिवाचा थरकार करणारा वणवा कालिदासाच्या लेखणीतून जेव्हा श्लोकबध्द होतो, तेव्हा त्यातला एकही परिणाम सुटत नाही.
कोकणात आंब्याच्या बागांना लागणारे वणवे, माळरानातल्या गवतांना लागणारे वणवे मी पाहिले आहेत. आणि त्यामुळेच या वर्णनांची चपखलता प्रत्ययाला येते.
सर्वांच्याच जिवावर एखादे महाभयंकर संकट कोसळते, तेव्हा आपल्यातील वैर, शत्रुत्व विसरून आजही माणसे आणि प्राणीही बचावासाठी एकत्र येतात असा अनुभव येतो. हे महाकवी कालिदास लिहितात म्हणून नव्हे, तर...
अगदी अलीकडे आमच्या भागात घडलेली घटना. रात्रीच्या वेळी एका आगरात कुत्र्याच्या मागे वाघ लागला. जिवाच्या भयाने धावताना कुत्रा विहिरीत पडला आणि त्यापाठोपाठ वाघही!
या पळापळीच्या आवाजाने घरातले, आसपासचे जागे झाले. आता कुत्रा आणि वाघ एकाच विहिरीत होते. आम्हाला वाटले, आता कुत्र्याचे काही खरे नाही. पण वाघाने कुत्र्याला काहीही केले नाही. सकाळी फॉरेस्ट ऑफिसरला कळवून वनरक्षक वगैरे आले आणि दोघांनाही जिवंत वर काढले. वाघ पिंजऱ्यात अडकला गेला. कुत्रा बाहेर पळाला. साऱ्यांनी काठावरून हे दृश्य पाहिले... तेव्हा माणसांचे असो वा प्राण्यांचे असो, कालिदास मानसशास्त्रही उत्तम प्रकारे जाणत होता.
'ऋतुसंहारम्' या खंडकाव्यातील ग्रीष्म ऋतूंचे वर्णन करणारा असा हा पहिला सर्ग!
'संहार' या संस्कृत शब्दाचा अर्थ विध्वंस, नाश असा होतो. तसाच 'गोळा करणे', संचय करणे, संक्षेप करणे असाही होतो. हा दुसरा अर्थ कालिदासाच्या या खंडकाव्याला लागू होतो.
कालिदासाने आपल्या काव्यलेखनाचा प्रारंभ 'ऋतुसंहारम्'पासून केला. निसर्गाचे आणि ऋतूंचे वर्णन हीच या काव्याची मुख्य कल्पना. इथे स्वत: निसर्गच काव्याचा नायक झाला आहे.
'अभिज्ञानशाकुंतल'मध्ये निसर्ग हा नाटकातील एक व्यक्तिरेखा वा पात्रच म्हणून येतो. एवढया सचेतनपणाने तिथे तो साकारला आहे.
रघुवंशामुळे त्याला 'कविकुलगुरू' ही उपाधी लाभली. 'उपमा कालिदासस्य' याचा प्रत्यय तर त्याच्या सर्वच वाङ्मयात येतो.
'रससिध्द कवीश्वर' हे तर त्याचे अविभाज्य बिरूद!
त्या मानाने कालिदासाच्या कमनीय शैलीचा व वाग्वैदग्ध्याचा प्रत्यय ऋतुसंहारमध्ये रसिकांना येत नाही. त्यामुळे ते थोडे दुय्यम प्रतीचे मानले जाते.
परंतु 'शाकुंतल' किंवा 'मेघदूत'सारखे नायक-नायिकाप्रधान असे हे काव्य नाही. त्यामुळे 'दिलखेचक' अशा शृंगार वा करुणरसांचा परिपोष इथे कमी प्रमाणात होणार, हे उघडच आहे. शिवाय हे त्याचे पहिले खंडकाव्य!
आज आपण पाहतो आहोत - पृथ्वीवरील ऋतुमान अनेक प्रकारांनी बदलत आहे. नेमेचि येणारा पावसाळा हे सृष्टीचे कौतुक आता उरलेले नाही. हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञसुध्दा चकतात. आकाशातले काळे मेघ कधी कधी लुप्तच होऊन जातात. आकाश भर पावसाळयात पांढरे फटक असते आणि शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते.
तर कधी अवेळी वृष्टी होऊन अनेक ठिकाणे, शेती होत्याची नव्हती होऊन जाते. थंडीचा गारवा कधीच पसार झालाय आणि पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे. अर्थात पृथ्वीवर माणसांनी चालवलेल्या विविध अत्याधिक अत्याचारांचेच हे परिणाम आहेत. अनेक प्रकारचे चाललेले 'संहार' साऱ्या सृष्टीवर, ऋतुमानावर परिणाम करीत आहेत. पूर्वीचा निरागस निसर्ग आज अनेक ठिकाणी रौद्र, विनाशकारी होतो आहे. अधिकाधिक सुखसोयींच्या मागे धावणाऱ्या माणसांचा 'विनाशकाल' जवळ येतो आहे.
या पार्श्वभूमीवर प्राचीन कालातील निसर्गसंपन्न सहा ऋतूंचे सुंदर वर्णन कविराज कालिदास जेव्हा श्लोकबध्द करतात, तेव्हा ती साहित्यकृत आस्वाद्य होते आणि निसर्गाला झुगारून, नेस्तनाबूत करून मानवाला कधीही विजयश्री मिळवता येणार नाही, हे अबाधित सत्य पुन्हा एकदा उजळून निघते!
'ऋतुसंहारम्'बद्दल आचार्य अत्रे आपल्या 'सूर्यास्त' या पुस्तकात अभिप्राय लिहिताना म्हणतात -
'कालिदासाचे ऋतुसंहार' हे काव्य निसर्गसौंदर्याच्या विविध रमणीय वर्णनांनी उचंबळून गेलेले आहे. त्यात वृक्षांची पल्लवराजी आहे, प्रफुल्ल पुष्पांचा सुगंध आहे, कोकिळांचे मधुर कूजित आहे, मेघांचा गडगडाट आहे, विद्युल्लतांचा कडकडाट आहे, मयुरांचे नृत्य आहे, जलप्रवाहांच्या क्रीडा आहेत, चंद्रकिरणांचे लास्य आहे. ती सर्व वर्णने वाचून मन धुंद होते.'
ऋतुसंहार अभ्यासताना हे पटते. वाङ्मयात निसर्गवर्णनाला पुढे पुढे जो सांकेतिकपणा आला, तो कालिदासाच्या वर्णनात आढळत नाही.
आनंदी, खेळकर, तरीही सूक्ष्म, मार्मिक अशा लेखनशैलीतून या भरतभूमीतील एका समृध्द संस्कृतीचे, अभिजात कलाविलासाचे दालन कालिदास आपल्यासमोर उघडून देतात. म्हणूनच 'कालिदास' हे भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक विशेषनाम होते!
मंदाकिनी नारायण गोडसे
9421264008