सुवर्णवेध चुकला

विवेक मराठी    09-Aug-2016
Total Views |


नेमबाज अभिनव बिंद्रा भारताचा एकमेव सुवर्णपदक विजेता खेळाडू. 2008साली बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने भारताला ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यामुळे रिओ ऑलिम्पिक 2016च्या भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान त्याला मिळाला होता. सव्वाशे कोटी भारतीयांच्या नजरा अभिनव बिंद्राच्या या स्पर्धेकडे लागून होत्या. अभिनव बिंद्राने अंतिम फेरी गाठली म्हणजे भारताला एक तरी पदक मिळेल व भारताचे रिओ ऑलिम्पिकमध्ये आपले खाते उघडले जाईल अशी सर्वांनाच आशा होती. पण कालचा दिवस हा भारतीय खेळाडूंचा नव्हता. अभिनव बिंद्राने सुरूवातीपासूनच 10मी एअर रायफलमध्ये उत्तम प्रदर्शन केले. शेवटच्या काही क्षणात त्याचा नेम चुकला व  त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि अभिनव सोबतच सगळया भारतीयांचे पदकाचे स्वप्न भंगले. अवघ्या 0.5च्या फरकाने अभिनवचे कांस्यपदक हुकले. अभिनव बिंद्राचे हे शेवटचे ऑलिम्पिक होते. त्याने ऑलिम्पिकमधून निवृत्ती घोषित केली आहे. अभिनवच्या अपयशाचे आणखी एक महत्त्वाचे कारण असे की, या स्पर्धेसाठी त्याने खास तयार करून घेतलेली रायफल तुटली. आणि त्याला पर्यायी रायफल घेऊन स्पर्धेत उतरावे लागले होते. हार पत्करावी लागली असली तरी रिओमध्ये अभिनवचा खेळ पाहायला आलेल्या दर्शकांनी टाळया वाजवून अभिनवला पाठिंबा दिला.


अभिनव पाठोपाठ भारतीय हॉकी संघालाही पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय पुरुष हॉकी संघाला जर्मनीने तर महिला संघाला ग्रेट ब्रिटनने पराभूत केले.

या सगळया पराभवांच्या मालिकेवर स्वतःच्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असणाऱ्या पेज थ्री सेलिब्रिटी शोभा डे यांनी टि्वटरवर अपमानास्पद टि्वट करून या खेळाडूंना लक्ष्य केले. या टि्वटवरून पुढे बराच गदारोळ सुरू झाला. त्यांच्या या टि्वटला अभिनव बिंद्रा आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा, अभिनेत्री गुल पनाग यांनी सडेतोड उत्तर दिले.


'गोल्डन मॅन'

जलतरणपटू मायकल फेल्प्स हा खऱ्या अर्थाने गोल्डन मॅन ठरला आहे. फेल्प्सला देवमासा म्हणूनही ओळखले जाते. यावर्षीच्या ऑलिम्पिकमधील एक आणि आधी 18 असे तब्बल 19 सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. या सुवर्णपदकानंतर त्याने ऑलिम्पिकमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अमेरिकेच्या संघाने 4#100 मी. रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ऑलिम्पिक व इतर स्पर्धांमध्ये एकूण 23 सुवर्णपदक मिळविणारा फेल्प्स हा जगातील एकमेव जलतरणपटू ठरला आहे. 19 वे सुवर्णपदक स्वीकारताना मायकल फेल्प्स भावूक झाला होता. अमेरिकाचे प्रतिनिधित्व करताना फेल्पसने आजपर्यंत आपल्या कामगिरीचा आलेख हा उंचावतच नेला आहे.