'सामाजिक रक्षाबंधन - संदेश पर्यावरणाचा!' 'ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर'

विवेक मराठी    13-Aug-2016
Total Views |

या वर्षी रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाच्या रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने 18 ऑॅगस्ट ते 28 ऑॅगस्ट 2016 या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर' हे सामाजिक अभियान योजिले आहे. दि. 18 ऑॅगस्ट ते 28 ऑॅगस्ट 2016 या काळात हे (फक्त पुणे विभागात) अभियान राबवले जाणार आहे. त्यानिमित्ताने हा लेख...

या वर्षी रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाच्या रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने 18 ऑॅगस्ट ते 28 ऑॅगस्ट 2016 या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर' हे सामाजिक अभियान योजिले आहे. दि. 18 ऑॅगस्ट ते 28 ऑॅगस्ट 2016 या काळात हे अभियान राबवले जाणार आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून रविवार, 28 ऑॅगस्ट रोजी सकाळी 10.00 ते दु. 1.00ई-कचरा व प्लॅस्टिक यांचे संकलन करण्यात येणार आहे. यात आपल्याला सगळयांना सहभागी होता येणार आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीची आणि तुमच्यातल्या सामाजिक बांधिलकीची.

सामाजिक रक्षाबंधन

अभियानकाळात आपण आपल्या सोसायटीत किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील घरात जाऊन बंधुभगिनींना राख्या बांधाव्यात आणि 'ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर' अभियानाची माहिती देऊन, त्यांचे प्रबोधनही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभियानादरम्यान निरनिराळया ठिकाणी सुमारे 44 प्लॅस्टिक आणि ई-कचरा संकलन केंद्रांची कायमस्वरूपी उभारणी करण्यात येणार आहे. दर रविवारी या केंद्रांतर्गत प्लॉस्टिकचे आणि ई-कचऱ्याचे संकलन, तसेच नागरिकांचे या संदर्भातले प्रबोधन करण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती खालील वेबसाइटवर उपलब्ध आहे.

poornamecovision.wordpress.com

sevavardhini.org, sevasahayog.org

ई-कचरा

ई-कचरा म्हणजे विजेवर वापरली गेलेली, पण नादुरुस्त झालेली उपकरणे. यात फ्रीज, चार्जर, टी.व्ही., रेडिओ, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, फूड प्रोसेसर, सी.डी.-डी.व्ही.डी. प्लेअर, कूलर, पंखे, सर्व प्रकारचे संगणक व त्याचे विविध घटक, लॅपटॉप, प्रिंटर्स, स्कॅनर, बॅटरी काढलेले यू.पी.एस., इन्व्हर्टर, मोबाइल, टेपरेकॉर्डर, मिक्सर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी. या उपकरणांमध्ये ऍंटिमनी, सेरियम, बिस्मथ, सोने, चांदी, बेरियम, कॅडमियम, तांबे, शिसे, कथिल (टिन) यांसारखी घातक रसायने असतात.

प्लॅस्टिक कचरा

प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, खाऊचे डबे, बादल्या, चमचे, प्लॅस्टिकच्या गोणी, खेळणी इत्यादी.

मात्र, टयूब लाइट्स, सीएफएल बल्ब, सेल, बॅटरी, बॅटरी काढता न येणारे मोबाइल, रंगाचे डबे, थर्माकोल, केमिकल/रासायनिक पदार्थ असणारे डबे, कपडे, गोणपाट, चिनी मातीच्या वस्तू, काचेच्या वस्तू अशा वस्तू या अभियानात गोळा करण्यात येणार नाहीत. या दोन्ही प्रकारच्या वस्तू ई-कचरा आणि प्लॅस्टिकमध्ये मोडत नसल्यामुळे हा नियम ठरवण्यात आला आहे.

दूरगामी परिणाम करणारे शत्रू

प्लॅस्टिक आणि ई-कचरा संपूर्णत: नष्ट होत नाही, परिणामत: मानवी शरीराला आणि पर्यायाने आरोग्याला हानी पोहोचते. तसेच हवा, पाणी, जमिनी यांचे प्रदूषण, हवामानातील बदल, तापमान वाढ आदी पर्यावरणीय ऱ्हासालाही सामोरे जावे लागते.

प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे पावसाळयात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे अनेक परिसरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी होते.

पुन:प्रक्रिया

नामशेष न होणारा हा कचरा पुन:प्रक्रिया केंद्रांमध्ये जाणे फार गरजेचे आहे. हा कचरा इतरत्र न टाकता संकलन केंद्रांवर जमा केल्यावर तो पुन:प्रक्रिया केंद्रांमध्ये पाठवला जातो. तेथे ई-कचऱ्यातील सुटे भाग वेगळे करून चांगल्या स्थितीत असणारे भाग विक्रीसाठी पाठवले जातात. वेगळे करता न येणाऱ्या घटकांचे तुकडे करून यंत्राच्या साहाय्याने त्यांची पावडर केली जाते. त्या पावडरमध्ये एक ते दीड मिलिमीटर जाडीचे धातू आणि इपॉक्सी या कणांचे मिश्रण असते. विलगीकरण उपकरणाच्या साहाय्याने या मिश्रणातून धातू व इपॉक्सीचे कण वेगळे काढले जातात. प्रक्रियेदरम्यान उडणारी धूळमिश्रित हवा पाईपद्वारे शुध्दीकरण यंत्रात पाठवली जाते आणि त्यातून शुध्द झालेली हवा बाहेर पडते.

पुनर्वापर

* वापरलेले साहित्य टाकून दिले जाते, त्याचा पुन्हा वापर करणे म्हणजे पुनर्वापर.

* प्रक्रिया केलेल्या पुनर्वापराच्या वस्तूंमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होण्यास मदत होईल.

* रोजगाराच्या संधी वाढतील, तसेच कचऱ्याची निर्मिती कमी होईल.

* पुनर्वापरामुळे सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्याही कमी होतील.

आपल्या जीवनशैलीत पुनर्वापराचा अंतर्भाव केल्यास पैसा, ऊर्जा, कच्चा माल आणि जागा यांची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.


आपला सहभाग

प्लॅस्टिक आणि ई-कचरा संकलन केंद्रे आज खूप मोठया संख्येने उपलब्ध नसली, तरी नजीकच्या भविष्यकाळात ती निर्माण होणार आहेत. त्यासाठी स्वयंसेवक म्हणून तुम्ही मदत देऊ शकता. तसेच, प्रबोधनाचे कामही तुम्हाला सहज करता येईल.

या कामासाठी आणि पर्यायाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तुमच्यासारख्या संवेदनशील, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक मित्र-मैत्रिणींची गरज आहे. तुमच्यासारखे स्मार्ट आणि हुशार स्वयंसेवकच आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत, असे वाटते. यात आपल्या पालकांनाही सहभागी करून घ्या.

आपले एक एक कुटुंब जर या मोहिमेत सहभागी झाले, तर वर्षभरातच आपला परिसरही प्लॅस्टिकमुक्त आणि ई-कचरामुक्त होऊ शकतो.

आपण हे करू शकतो

* प्लॅस्टिकचा वापर कमी करू.

* इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा पुरेपूर वापर करू.

* वापरा व फेका या संस्कृतीला आळा घालू.

* बाजारहाटासाठी कापडी पिशव्यांचा वापर करू.

* प्लॅस्टिकच्या आणि इलेक्ट्रिकल उपकरणांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करू.

* हा कचरा कमी कसा होईल या दृष्टीने कृती करू.

प्लॅस्टिकने आणि ई-कचऱ्याने संपूर्ण सजीव सृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. स्वत:ला बुध्दिमान म्हणवून घेणाऱ्या  मानवानेच तो धोका स्वत:हून निर्माण केला आहे. मग त्यानेच स्वत: या संकटावर चातुर्याने मात करायला सज्ज व्हायला हवे. आपले घर, आपला परिसर, पर्यायाने आपले पर्यावरण प्लॅस्टिक आणि ई-कचरामुक्त करून निरोगी राखायला हवे.

vivekedit@gmail.com