रिओ ऑलिम्पिकला सुरूवात झाली 207 देशांच्या खेळाडूंनी आपल्या आपल्या देशाच्या प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून, पदकाच्या दिशेने या खेळाडूंची घौडदोड सुरू आहे. रिओ ऑलिम्पिकच्या सोहळयात 10 जणांचा एक विशिष्ट संघ पाहायला मिळाला. तो संघ म्हणजे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ नव्हता. तो होता रेफ्युजी संघ. सिरीया आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आयसीसच्या दहशतीमुळे अनेकांनी सिरीयामधून स्थलांतर केले. तेथील लोक शेजारील देशांमध्ये निर्वासित म्हणून राहू लागले. त्या भागामध्ये निर्वासितांचा प्रश्न ऐरणीवर आला. यामध्ये असलेले अनेक हरहुन्नरी खेळाडू यांना ऑलिम्पिकसारख्या मोठया स्पर्धेत खेळता यावे, यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने यावर्षी ऑलिम्पिकमध्ये 208 वी टीम म्हणून रेफ्युजी टीम घोषित केली. या टीमचे सगळे निर्णय हे ऑलिम्पिक संघटनेच्या हातात असतील. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे सामील करण्यात आलेली ही पहिली रेफ्युजी टीम आहे. कोणत्याही देशाच्या झेंडयाखाली नव्हे तर ऑलिम्पिकच्या अधिकृत झेंडयाखाली हा संघ सगळया सामन्यांमध्ये भाग घेऊ शकतात. रिओ ऑलिम्पिकच्या या निर्णयामुळे ऑलिम्पिकच्या इतिहासात एक नवा पायंडा पाडला आहे.