***दिलीप करंबेळकर***
मालेगाव बॉम्बस्फोटाचे शोधप्रकरण ज्या तऱ्हेने सुरू आहे ते अवघ्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाला व पोलिसांना लाजेने मान खाली घालायला लावणारे आहे. शोध न्यायाचा करा, सत्याचा करा, कायद्याने करा, हिंदुत्ववादी संस्थांच्या बदनामीची सुपारी घेऊन तो करू नका.
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/
(PDF स्वरुपात मूळ लेख पाहण्यासाठी http://epaper.evivek.com/epaper.aspx?lang=2025&spage=Mpage&NB=2008-11-23#Mpage_1)
''सिमी', 'सनातन' संस्थांतील तरुण पिढी चुकीच्या दिशेने भरकटलेली आहे. नवी मुंबई, पनवेल, ठाणे येथे बॉम्बस्फोट झाले, तर नांदेड येथे बॉम्ब बनवताना स्फोट झाला. मात्र या घटनांच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्याचे पाहण्यात आलेल्या नाहीत. एखाद्या समाजाची बदनामी करणे हे देशाच्या दृष्टीने फायद्याचे ठरणारे नाही. ''
- शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री
(दैनिक प्रहारच्या प्रकाशन सोहळयातील भाषणात काढलेले उद्गार)
सके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान' या घोषणेचे संघर्ष पर्व गेली पंचवीसहून अधिक वर्षे आपण अनुभवत आहोत. पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या आता अगदी नाममात्र उरली आहे. भारताने स्वत:चे रक्त व पैसे खर्च करून बांगलादेश निर्माण केला. तिथूनही हिंदूंची हकालपट्टी होत असून आसाममध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातून बांगलादेशने साहाय्य केले आहे हे सिध्द होत आहे. पाकिस्तानच्या चिथावणीने खलिस्तानी चळवळ निर्माण झाली व पोसली गेली. भारताला एका पंतप्रधानाचे मोल देऊन त्याची किंमत चुकवावी लागली. त्यानंतर काश्मीरमधले काश्मीर खोरे निर्हिंदू झाले. गेली पंधरा वर्षे देशभरात दहशतवादी कारवायांनी थैमान मांडले आहे आणि संयुक्त आघाडी सरकारच्या काळात या कारवायांना ऊत आला आहे. जगभर फैलावणारे जिहादी तत्त्वज्ञान, पाकिस्तान व बांगलादेशमधील लष्कर आणि गुप्तहेर संस्थांचा सक्रिय पाठिंबा याचबरोबर स्थानिक मुस्लीम समाजात निर्माण झालेले जिहादी समर्थक गट यांची साखळी आगामी काळात कोणते उत्पात घडवून आणतील याचा अंदाज करणेही अवघड बनले आहे. या भीषण संकटाचा विचार करून त्यावर दूरगामी उपाययोजना करण्याऐवजी आगामी निवडणुकीत मुसलमानांची मते कशी मिळतील या एकमेव चिंतेने सत्ताधारी आघाडीला ग्रासले आहे. दहशतवादी मुस्लीम समाजाचेच असल्याने त्यांना पकडल्यावर त्या समाजालाच त्याचा त्रास होणे हे स्वाभाविकच आहे. यावर एकमेव उत्तर असू शकते. ते म्हणजे मुस्लीम समाजाला दहशतवादाचा त्याग करण्याचे आवाहन करणे व त्याचा परिणाम होत नसेल, तर तो मोडून काढण्याचा कणखरपणा आमच्यात आहे याचे धैर्य दाखविणे. सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्यापासून लालू, मुलायम, पासवान, अमरसिंग यांनी हा मार्ग अवलंबिण्याऐवजी हिंदू समाजालाच दहशतवादाच्या मार्गाला लावण्याचा चंग बांधला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास ज्या तऱ्हेने चालू आहे त्याचा हाच निष्कर्ष आहे.
29 सप्टेंबरला मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि केवळ मुस्लीमच दहशतवादी कसे असू शकतात, या प्रचाराला जोर आला. दै. प्रहारच्या उद्घाटन प्रसंगाच्या भाषणात शरद पवार यांनी पोलिसांना सूचक मार्गदर्शनच केले. दहशतवादाबद्दल एकाच समाजाला जबाबदार धरले जाते हे बरोबर नाही असे ते म्हणाले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलिसी वेशातील दहशतवादी पथकाने अक्षरश: बेभान होऊन शरद पवारांना द्रष्टे ठरविण्याचा चंग बांधला. खरे, खोटे, न्याय, अन्याय, कायदेशीर, बेकायदेशीर यांच्या सीमा ओलांडून हिंदू समाजालाही दहशतवादी कसे ठरविता येईल, यासाठी कंबर कसली आणि त्यातून भीषण पोलिसी अत्याचाराचे, प्रसारमाध्यमांच्या भ्रामक प्रचाराचे एक महाजाल उभे राहिले.
सापडले, सापडले
मालेगावच्या स्फोटामध्ये जी मोटारसायकल सापडली तिची मूळ मालकी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याकडे आहे हे पोलीस तपासात सिध्द झाल्याबरोबर महाराष्ट्रातील पोलीस व अखिल भारतीय सत्ताधारी नेते, स्वत:ला सेक्युलर म्हणविणारी प्रसारमाध्यमे यांना आनंदाच्या उकळया फुटू लागल्या. सूत हाती लागले होते. आता फक्त हिंदूंच्या बदनामीचा स्वर्गच बाकी राहिला होता. हिंदुत्ववादी शक्तींना, हिंदू समाजाला अतिरेकी दहशतवादी समजून झोडपून काढायला ही चांगली संधी आली असे समजून अक्षरश: आबांच्या पोलिसांनी धुडगूस घालायला सुरुवात केली. मोटारसायकल सापडल्यानंतर पोलिसांनी किमान दोन गोष्टी निश्चित करून घ्यायला हव्या होत्या. मोटारसायकलची प्रत्यक्ष मालकी अजूनही साध्वी प्रज्ञासिंग यांच्याकडेच आहे का व ती त्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आहे का?
साध्वी यांनी चार वर्षांपूर्वी शर्मा नावाच्या व्यक्तीद्वारे ती मोटारसायकल विकली होती. त्या व्यक्तीचा नंतर खून झाल्याने कागदपत्रांची पूर्तता करायची राहून गेली व तांत्रिकदृष्टया ती साध्वींच्याच नावावर राहिली. नंतर प्रज्ञासिंग यांनी संन्यास घेतलेला असल्याने व त्यानंतर प्रवचनासाठी फिरत असल्याने त्या मोटारसायकलचे काय झाले, याची माहिती त्यांना नव्हती. अगदी एक संशयित म्हणून का होईना, पण साध्वी यांच्या या वक्तव्यावर एक शक्यता म्हणून विश्वास ठेवून त्या मोटारसायकलचे पुढे काय झाले, याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा होता, परंतु तसे न घडता साध्वींच्या या संबंधामुळे हिंदू समाजाला व हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करता येईल, असा हर्षवायू विविध नेत्यांना आणि एटीएसला झाला व त्यातून हिंदुत्ववादी संघटनांसोबतच लष्कराचीही प्रतिमा धुळीला मिळविणारे षड्यंत्र आकार घेऊ लागले.
बॉम्बस्फोटासारख्या कोणत्याही घटनेचा तपास करीत असताना तीन प्रमुख गोष्टी निश्चित करण्याची आवश्यकता असते. बॉम्बची सामग्री कुणी दिली, बॉम्ब कुणी बनविला व कोणी बॉम्बस्फोटाच्या जागी ठेवला. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरडीएक्स कोणी पाठविले, कसे पाठविले, ते कोणी उतरवून घेतले, ते कोणत्या ट्रकने आले, त्या वेळी कोण कस्टम अधिकारी होते, ते बॉम्ब कोणी बनविले, कोणी ठेवले याची तर्कशुध्द साखळी मुंबई पोलिसांनी सिध्द केली होती. तो मुंबई पोलिसांच्या शोधतपासातील कर्तृत्वाचा सर्वोच्च क्षण होता, पण इथे खरे शोधण्याऐवजी बदनामीची मोहीम चालविण्याचाच प्रमुख हेतू असल्याने या मुद्दयांच्या चौकशीत पोलिसांना रसच नव्हता. त्यामुळे चौकशीच्या ज्या बातम्या बाहेर येत आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, ते पाहण्यासारखे आहे.
गुप्त बैठका, प्रशिक्षण
साध्वी प्रज्ञासिंग यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे संबंधित होते त्यांचे अटकसत्र सुरू झाले. त्या अटकसत्रानंतर ज्या बातम्या बाहेर येऊ लागल्या, त्यात वरीलपैकी एकाही मुद्याचा उलगडा होतो आहे काय? म्हणे अभिनव भारतच्या गुप्त बैठका होत होत्या. कोणतीही बैठक विशिष्ट निमंत्रितांसाठीच असते व इतरांसाठी ती गुप्तच असते. एवढया दिशाभूल करण्याच्या बातम्या पेरूनही नेमक्या कोणत्या बैठकीत मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा कट ठरला व त्यात कोण कोण होते हे पोलीस सांगत नाहीत. भारताच्या अणुस्फोट घडविण्याच्या निर्णयाइतकी ही गुप्त माहिती आहे काय? ही गुप्त बैठक सोडून इतर गुप्त बैठकी झाल्या काय आणि उघड बैठकी झाल्या काय, त्याच्याशी पोलिसांचे काय देणे घेणे? अभिनव भारत ही बंदी घातलेली संघटना नाही. तिने आपली प्रत्येक बैठक घेत असताना पोलीस स्टेशनला कळविले पाहिजे होते काय? भोसला मिलिटरी स्कूलमध्ये लष्करी प्रशिक्षण दिले जाते असा प्रचार होत गेला. भोसला मिलिटरी स्कूलच्या नावातच मिलिटरी असल्याने तिथे पाकक्रिया बनविण्याचे प्रशिक्षण द्यायचे की काय? पण या प्रशिक्षण वर्गातून प्रशिक्षित झालेला प्रत्येक विद्यार्थी दहशतवादी आहे की काय? भडक भाषणे देणे हा गुन्हा असेल, तर त्याचे कलम वेगळे आहे. त्यांचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध काय? पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये जप्त केलेली जी मालमत्ता दाखविली आहे, त्यात प्रत्यक्ष बॉम्बशी संबंधित कोणतीच वस्तू नाही. बेकायदा पिस्तुले सापडली असा पोलिसांचा दावा आहे. त्यांचा कायदा वेगळा आहे. बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध काय? परंतु पोलिसांनी प्रसारमाध्यमातून असे चित्र उभे करायला सुरुवात केली की, जणू अभिनव भारतचा कार्यकर्ता असणे हा गुन्हा आहे, त्यांच्या बैठकांत भाग घेणे हा त्याहून मोठा गुन्हा आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्या जिहादींविरुध्द बोलणे हा तर गुन्हयाचा कडेलोट आहे. जर आपले संरक्षण करण्यास सरकार व पोलीस षंढ ठरले, तर निदान आपले रक्षण आपणाला करता यावे, म्हणून प्रशिक्षण घेतले तर ते जणू तुम्ही सर्व मानवजातीलाच ठार मारू पाहणारे गुन्हेगार आहात असे चित्र रंगविण्यात आले. वसंत बापट आता हयात नाही, नाही तर कुठेही आग लावण्यात आली तर त्यांनी 'आता पेटवू सारे रान' ही कविता लिहिली म्हणून दहशतवादविरोधी पथकाने त्यांनाही पोलीस कस्टडी दिली असती.
लष्कराची अप्रतिष्ठा
अभिनव भारतचे प्रमुख कार्यकर्ते हाती लागूनही तपास एक इंचही पुढे सरकेना. मुंबई बॉम्बस्फोटात आरडीएक्स दाऊद इब्राहीमने पाठविले. अन्य बॉम्बस्फोटात ते आयएसआयने पाठविले, मग मालेगावात ते कोणी पाठविले. हिंदूंना दहशतवादी ठरविण्याच्या ईर्षेने पेटलेल्या दहशतवादविरोधी पथकाने मग लष्कराच्या अब्रूलाच वेठीस धरले. लेफ्ट. कर्नल पुरोहित हे लष्करी गुप्तहेर सेवेतील अधिकारी. पाकिस्तान-बांगलादेश येथील दहशतवादी संस्थांवर नजर ठेवणे, यांचा प्रतिकार करणाऱ्या भारताच्या योजनांचे सुसूत्रीकरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या संबंधात दहशतवादविरोधी पथकाच्या अनेक कार्यशाळांतही त्यांनी भाग घेतला होता. याच कामाचा एक भाग म्हणून अरेबिक भाषेचे ते प्रशिक्षण घेत होते. आर्मी इंटेलिजन्सचा एक भाग म्हणून जिवावर उदार होऊन कारवाया करू शकणाऱ्या तरुणांचा शोध घेणे, त्यांना प्रशिक्षित करणे हा त्यांच्या कामाचाच एक भाग होता, यासंबंधी लष्करच अधिक प्रकाश पाडू शकते, पण तपासात बॉम्बस्फोटाच्या दृष्टीने कोणतीच माहिती हाती येत नाही म्हणून पिसाळलेल्या एटीएसला लष्कराच्या प्रतिष्ठेची, राष्ट्रहिताच्या दृष्टीने ते करीत असलेल्या कामांची पर्वा कुठली? जणू काही ते आपल्या बॅगेतून आरडीएक्स घेऊन फिरत असावेत अशी एटीएसची समजूत असावी म्हणून त्यांच्याकडून आरडीएक्स मिळाल्याचा संशय व्यक्त करून त्यांचा पोलीस रिमांड मागण्यात आला. त्यांचा सहभाग कबूल करण्यासाठी त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. कारण आरडीएक्सचा स्त्रोत समजत नाही, तोवर तपास पुढे जाऊच शकत नाही. जेव्हा लष्कराने यापुढे एकाही अधिकाऱ्याला आम्ही तुम्हांला ताब्यात देणार नाही व लष्कराकडून आरडीएक्सचा पुरवठा शक्यच नाही, अशी तंबी एटीएसला दिली तेव्हा आबा पाटलांची व एटीएसची भाषा बदलली. त्यानंतरही पुरोहितांच्या बदनामीसाठी त्यांनी लष्कराच्या गोपनीय निधीचा बॉम्बस्फोटासाठी वापर केला अशी बदनामी सुरू केली. जणू काही शरद पवार, अमरसिंग, लालू, मुलायम पैशाच्या पेटया वाटतात किंवा पोलीस अधिकारी लाच म्हणून घेतात तशा पैशाच्या पेटयांच्या पेटया गुप्तहेर अधिकाऱ्यांना वाटण्याकरिता अधिकारी देत असावेत, अशी त्यांची कल्पना असावी.
अंदाधुंद अत्याचार
जेव्हा हातात निश्चित पुरावा येत नाही, तेव्हा नैराश्याने ग्रस्त झालेला माणूस अंदाधुंद वागू शकतो तशी एटीएसची अवस्था झाली आहे. हा त्याच्या परिचयातील आहे, त्याला मार, हा त्याचा ड्रायव्हर आहे त्याला ठोक, तिथून काही माहिती मिळेल का पाहण्यासाठी त्याला ताब्यात घे, असा प्रकार सध्या सुरू आहे. नाही तर साध्वींच्या घरी इपीबीएक्स सिस्टीम बनविणाऱ्या देवकर या इंजिनीअरला एटीएसने अमानुष मारहाण करण्याचे कारण काय? गावातून त्याची धिंड काढून त्याची बदनामी करण्यापूर्वी तुम्ही त्याचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी कोणता संबंध प्रस्थापित केला होता?
घृणास्पद संस्कृतीचे दर्शन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दहशतवाद निपटून काढू पाहणारेच आता पोलिसांविरुध्द बोलत आहेत, असा आरोप करीत आहेत. विलासराव, आबा प्रश्न दहशतवादविरोधी लढण्याचा नाही. मालेगाव बॉम्बस्फोट तपासाच्या प्रकरणी तुम्ही जे घृणास्पद संस्कृतीचे दर्शन दाखवीत आहात त्याचा आहे. हा तपास सुरू होऊन महिना उलटला, परंतु एटीएस अधिकृतपणे काही सांगत नाही व अनधिकृतपणे प्रसारमाध्यमात ज्या बातम्या पेरते त्यात तपासातील मूळ मुद्याविषयी एक शब्द नाही. तपासाचे मुद्दे असे असणे आवश्यक होते.
1) मालेगाव बॉम्बस्फोटाचा निर्णय कोणत्या बैठकीत ठरला,त्यात कोण सहभागी होते?
2) कोणावर कोणती जबाबदारी होती?
3) बॉम्बचे सामान कोणी पुरविले?
4) बॉम्ब कोणी बनविला व कोणी ठेवला?
हे मुद्दे स्पष्ट करा, मग प्रश्न संपतो, परंतु अजूनपर्यंत यांपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाल्याचे दिसत नाही. अटक केलेल्या व्यक्तींपैकी कोणीही देशद्रोही नाही. याची आम्हांला खात्री आहे, सरकार आमचे संरक्षण करू शकत नाही, आपणच आपले संरक्षण केले पाहिजे, या निराशेच्या भावनोत्कट अवस्थेतून काही जणांना असे कृत्य करावेसे वाटणारे लोक असू शकतात, तरीही देश कायद्याने चालतो व तो कायदा जो तोडतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे, परंतु ज्यांचे तत्त्वज्ञानच हिंसाचारावर आधारित आहे, जे शत्रू राष्ट्राचे हस्तक म्हणून वावरत आहेत त्यांची व यांची तुलना होऊच शकत नाही. तरीही बॉम्बस्फोट हा असे उत्तर देण्याचा मार्ग नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, लोकांचे परिवर्तन करून सत्ता परिवर्तन घडविता येऊ शकते व त्या आधारावर समोरचे प्रश्न सोडविता येऊ शकतात, यावर आमचा विश्वास आहे, जिहादी तत्त्वांना पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या सार्वभौम राष्ट्रात आश्रय मिळतो आणि तसा हिंदू अतिरेक्यांना कुठेही मिळणार नाही व हिंदूंना स्वत:च्याच देशात पोरके बनविणारे सरकार असल्याने हा विचार जसा तत्त्वत: चुकीचा आहे, तसा व्यवहारी हिताचाही नाही, याची आम्हांला खात्री आहे, पण तरीही अफजल गुरू आणि लेफ्ट. कर्नल पुरोहित यांची बरोबरी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो कसा सहन करता येईल? एकाने देश उद्ध्वस्त करण्याची स्वप्ने पाहिली आहेत, तर आज जे आरोपी म्हणून पोलिसांनी उभे केले आहेत, त्यांनी देश बलशाली करण्याची स्वप्ने पाहिली आहेत, पण आमचा मुद्दा तोही नाही. पुढील निवडणुका डोळयासमोर ठेवून हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्याच्या अभिनिवेशाने आबा तुम्ही आणि तुमच्या पोलिसांनी कायद्याला धाब्यावर बसवून ज्या गोष्टी चालविल्या आहेत, त्याचा आम्ही तुम्हांला जाब विचारत आहोत.
उठल्या सुटल्या दमबाजी करीत सुटण्याची आबांना सवय आहे. जिहादी दहशतवाद्यांनी देशभर आकांत मांडला आहे. सर्व भारताला आतंकवादाच्या ज्वालांनी भाजून काढण्याचा त्यांचा संकल्प आहे. तो संकल्प यशस्वी झाला, तर भारतावर कोणत्या संस्कृतीचे अधिराज्य निर्माण होईल, याची आबा तुम्हांला कल्पना तरी आहे काय? की सत्ता मिळविण्याच्या लोभाने दूरचा विचार करण्याची शक्तीही तुम्ही गमवून बसला आहात. जर परिस्थिती अशी चिघळत गेली, तर आणखी पन्नास-पंचाहत्तर वर्षांनंतर काय घडेल हे कळण्यासाठी पाकिस्तानकडे पाहा. आपल्यापैकीच काही नाती-पणतींना कायद्याने नव्हे, तर मौलवींच्या आदेशानुसार दगडांनी ठेचून मारण्याची किंवा कुत्र्यांनी लचके तोडून मारण्याची शिक्षा होऊ शकते,भारताचे भवितव्य इथल्या निवडणुकांतून न घडता टोळीयुध्दातून ठरू शकते. ज्या पंढरीच्या वारीचा तुमच्यासह उभ्या महाराष्ट्राला अभिमान आहे, त्या पंढरपूरच्या अस्तित्वालाच धोका पोहोचू शकतो. हे येणारे संकट महाभीषण आहे. जर जिहादी दहशतवादी यशस्वी झाले, तर आज सौदी अरेबियात, पाकिस्तानात काय सुरू आहे, ते पाहून आपल्याला भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा तरी सारासार विवेक बाळगा!
दहशतवादाला धर्म नसतो, ही सर्व राजकारण्यांची आवडती ओळ आहे. दहशतवादाला धर्म असतो की नसतो हे आम्हांला माहिती नाही, पण त्यामागे तत्त्वज्ञान निश्चित असते. ते असते म्हणूनच दहशतवादी हा केवळ खुनी नसतो. आपल्या शासनाला दहशतवादाचा सामना करता येत नाही म्हणून नैराश्याने ग्रस्त झालेल्यांनी काही ठिकाणी काही किरकोळ बॉम्बस्फोट केले आहेत, पण त्याचा तपास करीत असताना जणू काही देशभरात सगळया हिंदुत्ववादी संघटना अतिरेक्यांच्या फौजांच्या फौजा उभ्या करीत आहेत, असे वातावरण तयार करण्याचा उद्योगच हिंदू समाजाला दहशतवादी बनवू शकतो. जर वाघ म्हणूनही खातो, वाघ्या म्हणूनही खातो, तर सरळ वाघ्याच का म्हणून घेऊ नये, असा टोकाचा विचार करायला समाजाला भाग पाडू नका. मालेगाव बॉम्बस्फोटाचे शोधप्रकरण ज्या तऱ्हेने सुरू आहे ते अवघ्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाला व पोलिसांना लाजेने मान खाली घालायला लावणारे आहे. शोध न्यायाचा करा, सत्याचा करा, कायद्याने करा, हिंदुत्ववादी संस्थांच्या बदनामीची सुपारी घेऊन तो करू नका.
ही तर धडा शिकविण्याची वेळ!
देशभरात पोलिसांनी अनेक बॉम्बस्फोटांच्या घटनांचे तपास लावले. त्यांपैकी अनेक खटल्यात तर आरोपींची नार्को टेस्ट घ्यावीच लागली नाही. कारण आरोपींकडून माहिती मिळविणे एवढेच काम पोलिसांना करायचे होते. माहिती 'तयार' करण्याचा तेथे हेतू नव्हता, परंतु या तपासात 9 पैकी 6 आरोपींची बे्रन मॅपिंग, पोलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यात आली. काही जणांबाबत तर दोन, तीन वेळा करण्यात आली. नार्को टेस्टचा उपयोग पुराव्यासाठी नसतो, तर तपासाला मदत मिळण्यासाठी असतो. जर सर्व आरोपींनी मिळून एकत्र कट केलाअसेल, तर एकाची किंवा जास्तीत जास्त दोघांची नार्को टेस्ट घेऊन भागले असते, कारण एकदा कटाची माहिती मिळाली की प्रश्न फक्त दुवे जुळविण्याचा राहतो. एवढया आरोपींची नार्को टेस्ट घ्यावी लागते, याचा अर्थच त्या सर्वांना एकत्र बांधणारा कोणताही दुवा तपासपथकापाशी नाही हे स्पष्ट होते.
नार्को टेस्टमध्ये माहिती मिळालेल्या सर्वच जणांना पोलीस ताब्यात घेण्याचा निर्णय घेत आहेत. हेच तत्त्व तेलगीच्या नार्को टेस्टला का लावले नाही? तेलगीच्या नार्को टेस्टमध्ये जी नावे घेतली आहेत त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची आपल्या तऱ्हेने चौकशी केली काय?
दिशाभूल सरकारी माहिती
पोलिसांनी दिशाभूल करणारी किती माहिती प्रसारमाध्यमात पेरावी याला मर्यादाच उरलेली नाही. साध्वींच्या दूरध्वनीवरील संभाषणाचा पुरावा आपल्याकडे अाहे, असे आरंभी न्यायालयात पोलिसांनी सांगितले. त्यावर सर्वांची समजूत अशी झाली की टेलिफोन टॅप करून मिळालेले संभाषण पोलिसांकडे आहे, पण नंतर हे उघड झाले की, दोघांचे संभाषण सुरू असताना रामजीच्या एका बाजूने धर्मेंद्र बजरंगीही संभाषण ऐकत होता व त्याने ती दिलेली माहिती आहे. एका बाजूने ऐकलेली ज्याच्या विषयीची व ज्या संभाषणाची विश्वासार्हता सिध्द व्हायची आहे, ती माहिती पुरावा म्हणून पोलीस प्रसारमाध्यमातून फेकत होते.
तसाच प्रकार सिंहगडावर लष्करी प्रशिक्षण दिला गेल्याचा. जर सिंहगडावर तानाजीची आठवण ठेवून शौर्याची प्रेरणा निर्माण करणारे प्रशिक्षण द्यायचे नाही तर ते काय केवळ लैला-मजनूचे पर्यटनस्थळ किंवा दारूच्या व रेव्ह पाटर्या करण्याचे स्थान बनवायचे? जिथे हाती असलेल्या आरोपींचा मालेगाव बॉम्बस्फोटातील सहभाग असून स्पष्ट व्हायला आहे, तेथे प्रशिक्षणाच्या बातम्या घोळवून घोळवून देण्याचे कारण काय?
समझौता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फोटांच्या तपासणीमध्ये आलेल्या आरोपींच्या नार्को टेस्टमध्ये सिमीचा कमांडर सफरदार नागोरी यांने हा सिमीचा कट असल्याची कबुली दिली आहे. तरीही या बातम्या पेरल्या जात आहेत. ही बातमी देणारे रेल्वेचे पोलीस अधिकारी होते आणि लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री आहेत, हे समजले म्हणजे याचे उगमस्थान कोठे अाहे हे लगेच लक्षात येते.
मानवी हक्कांना तिलांजली
या तपासात पोलिसांनी मानवी हक्कांची किती पायमल्ली करावी याला सुमारच राहिलेला नाही. साध्वींना अटक केल्यानंतर चौदा दिवसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. कायदेशीर आवश्यकता असूनही 'ब्रेन मॅपिंग' पॉलिग्राफ चाचणीच्या वेळी वकिलांना हजर राहू दिले नाही. सर्वच आरोपींना पोलीस कस्टडीत बेसुमार मारहाण झाल्याच्या बातम्या आहेत. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल होत आहे.
द्रौपदीचा आकांत
दुर्योधनाच्या राजसभेत द्रौपदीचे जे वस्त्रहरण झाले, तसेच या तपासात न्याय, कायदा, मानवी हक्क यांचे वस्त्रहरण झाले आहे व होत आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण पाहून भीमाच्या डोळयात जो अंगार साठला होता त्या प्रमाणेच ज्यांना न्याय, मानवी हक्क, सुसंस्कृतता यांची चाड आहे, त्यांचा संताप व्हावा अशी ही अवस्था आहे. काहीही करून मुस्लीम मते मिळाली पाहिजेत, या लालसेने अंध झालेल्या राजकारण्यांनी या कपटनाटयाची संहिता लिहिली आहे व पोलीस ती इमानाने पार पाडीत आहेत. ही वेळ शांत बसण्याची नाही, तर सत्य, न्याय, आणि कायद्याचे धिंडवडे काढायला ज्या प्रवृत्ती सिध्द झाल्या आहेत, त्यांच्याविरुध्द कणखरपणे लढण्याची वेळ आता आली आहे. हिंदू द्वेषाने प्रसारमाध्यमे एवढी आंधळी झाली आहेत की, कोणत्याही तपासात पडणारे सोपे प्रश्नही त्यांना तपासपथकाला विचारावेसे वाटत नाहीत. तपासपथकाला जी दिशाभूल करणारी माहिती पेरायची आहे ती करून देण्याची त्यांची स्वत:हूनच तयारी आहे, या सारखी आणखी कोणती दुर्दैवाची अवस्था असेल?
पुढचा लढा हा कायद्याचा आहे. न्यायालयाच्या पातळीवर झालेला अन्याय दूर होण्यासाठी तो लढला जाईल. दुसरा लढा हा आंदोलनाचा आहे. आपल्याच करामधून ज्यांचा पगार होतो ते पोलीस जर कोणाच्याही चिथावणीने सत्य शोधण्यापेक्षा आपली शक्ती, बुध्दी, आणि कर्तृत्व राजकीय सूडबुध्दिने, देशहिताचा विचार करणाऱ्यांविरुध्द वापरत असतील, तर त्याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महाराष्ट्रात व देशभर श्रम आंदोलनाने सामर्थ्य दाखविले पाहिजे.
तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा राजकीय शक्तिप्रदर्शनाचा आहे. मतपेढीने आंधळे होऊन राष्ट्रहित-अहिताचा विचार करण्याची सारासार विवेकबुध्दी ज्यांनी गमावली आहे, त्यांना मतपेटीद्वारे धडा शिकविण्याची वेळ आली आहे. *****
पोलिसांचा तपास व प्रसारमाध्यमांद्वारे चाललेली मीडिया ट्रायल याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आरुषी खून तपास. नोएडा येथे आरुषी मृतावस्थेत सापडल्यावर दुसऱ्या दिवशी हेमराज या नोकरावर संशय घेतला गेला, पण तोही मृतावस्थेत सापडला. त्यानंतर पोलीस उपमहासंचालकांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देऊन तिचे वडील डॉ. राजेश तलवार हेच खुनी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर हे प्रकरण उत्तर प्रदेश सरकारने सीबीआयकडे दिले. सीबीआयचे तपास अधिकारी अरुण कुमार रोज नवनवीन बातमी प्रसारमाध्यमांना देत होते. आम्ही कृष्णा कंपाऊंडरला पकडले व त्याने कबुली दिली. डॉ. दुराणी, राजकुमार, त्यांचा नोकर विजयमंडल, रोज नवनवे आरोपी, त्यांचे ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ व नार्को टेस्ट याद्वारे आता खुनी मिळालाच, फक्त आरोपपत्र ठेवायचे बाकी असे वातावरण तयार करण्यात आले. आज एकावरही आरोपपत्र दाखल होऊ शकले नाही. सर्व संशयित आरोपी बाहेर आहेत व सीबीआयसमोर अजूनही तपासाची दिशा नाही.
करकरेंचे लष्कराकडून थंड स्वागत
महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे मागील आठवडयात दिल्लीत आले असता लष्कराने त्यांचे अतिशय थंड स्वागत केल्याचे समजते. करकरे यांची दिल्ली भेट गोपनीय ठेवण्यात आली होती.
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव स्फोटांच्या संदर्भात काही लष्करी अधिकाऱ्यांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी करकरे दिल्लीत आले होते. करकरे यांनी लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, आमच्याजवळ काहीही माहिती नाही, तुमच्याजवळ जी माहिती आहे ती आम्हांला द्या, असे खोचक उत्तर लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना दिले असे समजते.
करकरे यांना कोणतीही माहिती न देण्याचा र्निणय लष्कराच्या सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला होता. करकरे दिल्लीत येतील तेव्हा त्यांना कोणती माहिती द्यायची की द्यायची नाही, याचा विचार लष्कराने केला होता. करकरे यांना कोणतीही माहिती देण्यात येऊ नये, असा र्निणय अधिकाऱ्यांमध्ये झाल्याचे कळते. महाराष्ट्र एटीएसला सहकार्य करण्याची आमची भूमिका होती, त्याच भूमिकेतून आम्ही लेफ्ट. कर्नल पुरोहित यांना एटीएसच्या स्वाधीन करण्याचा र्निणय घेतला होता, पण नंतर आम्ही केलेली चौकशी व एटीएस करीत असलेला चौकशीचा तमाशा या बाबी लक्षात घेऊन आम्ही नवी कोणतीही माहिती करकरे यांना न देण्याचा र्निणय घेतला. आम्ही करकरे यांना कोणतीही माहिती दिली असती, तर ती माहिती अर्धा तासात सर्व चॅनेलवर झळकली असती. मग आमची बदनामी आम्हीच का करून घ्यायची असा विचार करून करकरे यांना माहिती न देण्याचा र्निणय झाला.
लष्करात करकरेंबद्दल आकस निर्माण होण्याचे कारण काय, या प्रश्नावर एक सूत्र म्हणाले, करकरेंनी प्रसिध्दीच्या हव्यासापोटी लष्कराची किती बदनामी केली आहे, याची तुम्हांला कल्पना नाही. भारतीय सैन्य दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी आहे असा 'मॅसेज' साऱ्या जगात गेला आहे, याला कोण जबाबदार आहे, हे नुकसान कोण भरून देणार आहे. मुंबई पोलीस टोळीयुध्द हाताळीत असतात, एका टोळीने दिलेली माहिती दुसऱ्या टोळीविरुध्द वापरायची ही पोलिसांची पध्दत असते. करकरे याही प्रकरणात तसेच करायला गेले. लष्कराला गोवण्याची संवेदनशीलता व गंभीरता समजण्यात ते कमी पडले म्हणून हे झाले असावे, जाणूनबुजून त्यांनी हे केले असे वाटत नाही, अशीही पुस्ती एका सूत्राने जोडली.
(11 नोव्हेंबरच्या 'नागपूर तरुण भारत'मधून साभार)