स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेमध्ये वैदिक तत्वज्ञानाचा जगाला परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी अमेरिका आणि युरोप येथे योगाचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हाच वसा योगानंद,शिवानंद या सारख्या अनेक योगागुरुनी पुढे चालू ठेवला. त्याचे परिणाम आज जगभर दिसत आहेत.आज योग विश्वव्यापी झाला आहे याचे प्रत्यंतर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी युनोमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यावेळी दिसून आले. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली मध्ये हा प्रस्ताव बिनविरोध संमत झाला.या असेंब्ली मध्ये सामील असलेल्या अनेक मुस्लीम देशांनीदेखील या ठरावाला पाठींबा दिला. अफगाणीस्तान, बांगलादेश, इराण, तुर्कस्तान, इंडोनेशिया,युनायटेड अरब अमिरात.कतार,ओमान हे देश या प्रस्तावाचे अनुमोदक होते. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन चे सदस्य असलेल्या या सत्तेचाळीस मुस्लीम देशांपैकी पाकिस्तान,सौदी अरेबिया,मलेशिया,ब्रुनेई,कमेरुन,लिबिया आणि मोरीशियाना (Mauritiana) हे फक्त आठ देश तटस्थ राहिले.त्यांनी ठरावाला अनुमोदन दिले नाही.अन्य एकोणचाळीस मुस्लीम देशांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
उत्तर कोरिया,नामिबिया,स्वाझीलंड,स्वित्झर्लंड,मोनाको,झाम्बिया आणि सोलोमन आयलंड या सात अन्य देशांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले नाही.हे पंधरा देश वगळले तर विश्वातील एकशे सत्त्याहत्तर देश या योगदिनाच्या प्रस्तावाचे सह अनुमोदक होते.योग विश्वव्यापी झाला आहे याचेच हे समर्थ दर्शन होते.
पाकिस्तान सारख्या आठ मुस्लीम देशांनी या ठरावाला अनुमोदन दिले नसले तरी या देशात देखील योग शिकवला जातो,केला जातो,तो लोकप्रिय होत आहे.पाकिस्तानमध्ये शंभराहून अधिक योगकेंद्रे आहेत आणि त्यांनी दोन्ही वर्ष योगदिन उत्साहाने साजरा केला.शमशाद हैदर हे पाकिस्तान मधील एक प्रमुख योगगुरू असून त्यांची योगा पाकिस्तान हि संस्था लाहोरमध्ये पन्नास पेक्षा अधिक योगकेंद्रे चालवते.हैदर यांच्या मते योग हे विज्ञान असून ते अखिल मानवजातीसाठी आहे.हैदर यांनी योगाचे प्रशिक्षण म्यानमार,तिबेट,श्रीलंका आणि भारतामध्ये घेतले.भारतात त्यांनी सत्यनारायण गोएंका यांचे विपश्यना शिबीर देखील केले. 94 सालापासून ते योग शिकवू लागले.लाहोर,रावलपिंडी,इस्लामाबाद आणि कराची या शहरात त्यांची योग केंद्रे असून त्यामध्ये दहा हजार पेक्षा अधिक माणसे योग साधना करतात.
शिया बहुल इराण मध्ये देखील योग लोकप्रिय झाला आहे.तेथे तेहरान मध्ये ५० योगकेंद्रे असून संपूर्ण इराण मध्ये २०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिकवला जातो.तेथे योगाने एक खेळ आणि एकाग्रता वाढवण्याचे तंत्र म्हणून प्रवेश केला असला तरी आता आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अय्यंगार योगा अशा स्पष्ट नावाने प्रसारित केला जात आहे.याला काही कट्टरपंथीय खोमेनी समर्थक मुस्लिमांचा विरोध असला तरी त्यामुळे योगाची लोकप्रियता कमी होणार नाही असे तेथील योगशिक्षिका मेह्नुदा यांचे मत आहे.इराण मधील अनेक विद्यापीठात योगचिकित्सा आणि त्याचे औदासिन्य,दमा,सांधेदुखी यासारख्या आजारात उपयोग यावर संशोधन होत असते.
मुस्लीम देशांप्रमाणेच कम्युनिस्ट चीन मध्ये योग अनेकांचे आकर्षणं ठरत आहे.कम्युनिस्ट तत्वज्ञान धर्म आणि अध्यात्म नाकारते,त्यामुळे बौद्ध धर्म किंवा तिबेटी दलाई लामा यांच्या शिकवणुकीनुसार केले जाणारे ध्यान यावर चीन मध्ये बंदी आहे.योग मात्र सरकारी पातळीवर देखील मान्य होत आहे.भारत आणि चीन यांच्या सहकार्य करारामध्ये योगाचा समावेश आहे.दहा वर्षांपूर्वी चीन मध्ये योगाचा प्रवेश व्हाया अमेरिका झाला.अमेरिकेत राहिलेल्या दोन स्त्रियांनी प्रथम बिजींगमध्ये फिटनेससाठी योग वर्ग सुरु केला.त्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर गेल्या दहा वर्षात योग केंद्रे झपाट्याने वाढत आहेत.योग हा तेथे आधुनिक हेल्थ कोन्शस तरुणाईचा सिम्बॉल झाला आहे.चीन मधील अंदाजे एक कोटी माणसे योग करत असावीत असा अंदाज आहे.अमेरिके प्रमाणेच चीन मध्ये योग आणि योग स्टुडीओ यांचे उत्तम मार्केटिंग केले जाते.योगा साठी वापरले जाणारे कपडे देखील ब्रांडेड असतात.तेथील स्पोर्ट ब्रान्ड ली निंग (Li Ning) ने खास योगाड्रेस,स्त्रियांसाठी खास कपडे मार्केट मध्ये आणले आहेत.आणि ते तरुणींमध्ये इन आहेत.चीन मध्ये पारंपारिक ताई ची नावाचा योगाशी साम्य असणारा प्रकार होता पण तो पारंपरिक गुरु शिष्य परंपरेने शिकवला जातो.त्याचे आधुनिक पद्धतीने मार्केटिंग केले जात नाही.
आधुनिक योग चीनमध्ये अमेरिकेतून आला असला तरी आता येथे भारतीय योग शिक्षकांना अधिक पसंती दिली जाते.याचे श्रेय योगगुरू अय्यंगार यांना आहे.ते आणि त्यांचे शिष्य मोहन भांडारी चीनला जात राहिले.त्यांनी तेथे दहा हजार योग शिक्षक तयार केले आहेत. मूळ भारतीय योग शिक्षकांचे महत्व तेथील माणसांना कळू लागले आहे..योगी योगा हि चीन मधील योगकेंद्रांची सर्वात मोठी साखळी आहे.ते २०००० विद्यार्थ्यांना एका वेळी योगाचे प्रशिक्षण देत असतात.या कंपनीचा गेल्या वर्षीचा व्यवसाय चाळीस लाख डॉलर्सचा झाला,जो गेल्या दहा वर्षात चार पट वाढला आहे.भारतीय योग शिक्षक चीन मध्ये स्थायिक झाले तर त्यांना तेथे उत्तम संधी आहे.
योगाचे सर्वात मोठे मार्केट अर्थातच अमेरिका हे आहे.एका प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार अमेरिकेतील पंधरा टक्के म्हणजे तीन कोटी साठ लाख माणसे योगाभ्यास करतात,यातील पुरुषांचे प्रमाण एक कोटी आहे.यातील ५८% माणसे हि चाळीशी पार केलेली आहेत म्हणजे योगाभ्यास करणाऱ्या पैकी ४२% तरुण आहेत..चार वर्षांपूर्वी योग करणाऱ्या अमेरिकन्स चे एकूण प्रमाण दोन कोटी होते.अमेरिकेतील अठ्ठावीस टक्के लोकांनी कधीनाकधी योग केला आहे.पुढील वर्षभरात आठ कोटी म्हणजे पस्तीस टक्के लोकांनी योग शिकून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.नव्वद टक्के अमेरिकन्सनी योगाविषयी काहीनाकाही ऐकले किंवा वाचले आहे.चार वर्षांपूर्वी हे प्रमाण सत्तर टक्के होते.योग करणाऱ्या माणसांपैकी ३७ % माणसांना योगाचे बाळकडू त्यांच्या पालकांकडून मिळाले आहे तर ३३% माणसांना त्यांची मित्रांनी योग शिकवला आहे आणि फक्त ६% माणसे जाहिरातीमुळे योगाकडे वळली आहेत.अमेरिकेत योगा हा एक मोठा बिझिनेस असला तरी योगाची पहिली ओळख ३७% माणसांना प्रथम त्यांच्या कुटुंबात झालेली आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. योगा क्लासचा या वर्षाचा एकूण व्यवसाय ६ बिलिअन डॉलर असेल आणि योगाभ्यास करणारे साधक ४ बिलिअन म्हणजे चारशे कोटी डॉलर योगाच्या कपड्यांवर खर्च करतील असा अंदाज आहे.अशा प्रकारे अमेरिकेत योग हि एक मोठी इंडस्ट्री आहे.अमेरिके मध्ये योगाची वेगवेगळी स्कूल्स आहेत. अय्यंगार,कुंडलिनी,अष्टांग,शिवानंद,पॉवरयोगा,विन्यास आणि बिक्रम योगा हि त्यातील प्रमुख असून अयंगार योगा करणारे ४०%,अष्टांगयोगा स्वीकारणारे ३०% ,पॉवर योगा ९% आणि बिक्रम योगा ७% असे त्यांच्या अनुयायांचे प्रमाण आहे..
अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने केलेल्या सर्व्हेनुसार योगाचा समावेश सर्वाधिक वीस ट्रेंड्स मध्ये होतो.कॅनडा मधील ९% लोक योग करतात आणि ते योगाचा स्वीकार एक चिकित्सा म्हणून करतात.ऑस्ट्रेलिया मध्ये देखील योगशिक्षक आणि योगाचे विद्यार्थी यांची संख्या वाढते आहे.तेथे पाच हजार पेक्षा जास्त शिक्षक आणि एक लाख विद्यार्थी असावेत असा अंदाज आहे.योग करणाऱ्या माणसात पूर्वी प्रौढ माणसे अधिक असत पण आता तरुण स्त्री पुरुषांचे प्रमाण वाढते आहे.जर्मनी मध्ये दहा हजार पेक्षा अधिक योग शिक्षक असून दोन लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत.जपान मध्ये जपान योगा निकेतन नावाची प्रमुख संस्था असून बारा कोटी लोकसंख्येतील वीस लाख पेक्षा अधिक योग साधक आहेत.सिंगापूर आणि तैवानमध्ये देखील योगाची बाजारपेठ वाढते आहे.
या सर्व देशात योगाची लोकप्रियता वाढण्याची काही कारणे आहेत.येथे योग हा शरीराची लवचिकता वाढवणारा सर्वात चांगला मार्ग म्हणून स्वीकारला जातो. योग स्वीकारण्याचे दुसरे महत्वाचे कारण तो मानसिक तणाव कमी करतो हे आहे.तो केल्याने मन शांत होते,एनर्जी वाढते हा अनुभव आल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांना योग प्रशिक्षण सुरु केले आहे. त्यामुळे मध्यमवयीन माणसे योगाभ्यास करू लागतात. योगाचा स्वीकार एक नैसर्गिक आरोग्यदायी जीवनशैली म्हणून देखील होतो.त्यामुळेच योगाभ्यास करणारे पन्नास टक्के लोक सेंद्रिय अन्नपदार्थ निवडतात आणि सामाजिक कार्यात सहभागी होतात.योग पर्यायी चिकित्सा म्हणून देखील उपयोगी ठरत असल्याने चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या हृदयरोग,डायबेटीस,अती रक्तदाब यासारख्या आजारांचा प्रतिबंध आणि उपचार म्हणून योग स्वीकारणार्याची संख्याहि मोठी आहे.वजन कमी करण्यासाठी आणि प्रसूती सुलभ होण्यासाठी महिला मोठ्याप्रमाणात योगाकडे आकर्षित होतात. योग एक खेळ म्हणून देखील स्वीकारला जातो,त्याच्या स्पर्धा होतात,गोल्फ प्रमाणे योगाचे क्लब असतात आणि तेथे तरुण विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो.योगाभ्यासाने एकाग्रता वाढते,आपापसातील भांडणे कमी होतात म्हणून तो शाळातून शिकवला जातो. अशा प्रकारे सर्व वयातील माणसांना योगाचे शिक्षण उपयुक्त ठरत असल्याने तो वेगाने पसरत आहे.
अर्थात योगाचा असा प्रसार होताना त्याला विरोधाला तोंड द्यावे लागले आहे.युरोप आणि अमेरिकेतील कट्टरपंथीय ख्रिश्चन योग हा हिंदुधर्माचा भाग आहे असे म्हणून विरोध करीत आलेले आहेत.तेथे चर्चमध्ये गेट टुगेदर साठी जागा भाड्याने दिली जाते पण अनेक ठिकाणी हे गेट टुगेदर योगासाठी होत आहे असे कळले कि नकार दिला जातो.पाकिस्तानमध्ये देखील कट्टर मुस्लिमांचा योगाला विरोध आहे.तेथे हैदर यांच्या योगकेंद्रावर हल्ले झाले,एक योगकेंद्र जाळले गेले.मलेशियामध्ये २००८मध्ये एक फतवा काढून पाच राज्यात योगावर बंदी आणली गेली. कालीफोर्निया मध्ये आठ शाळांमध्ये योग शिकवला जात असे,तेथे हे धार्मिक शिक्षण आहे असा आक्षेप काही पालकांनी घेतला.कोर्टात केस घातली.
हा विरोध कमी करण्यासाठी आणि योगाचा प्रसार चालू ठेवण्यासाठी योग समर्थक काही क्लुप्त्या काढतात. योग हा हिंदुधर्माचा भाग नसून तो अखिल मानव समाजाला उपयोगी असणारा शरीर मनाचा व्यायाम आहे असा प्रसार केला जातो.अजूनही अमेरिकेतील शाळातून योग शिकवला जातो पण आसनांची संस्कृत नावे बदलून त्यांना आधुनिक इंग्लिश नावे दिली आहेत.सूर्य नमस्कार घातले जातात पण त्यांना ओपनिंग सिक्वेन्स म्हटले जाते.पद्मासानाला क्रिसक्रॉस म्हटले जाते. चीनमध्ये सर्व धर्मांवर आणि धर्म प्रसारावर बंदी आहे.तेथेदेखील कम्युनिस्ट विचारवंतांकडून योग हा हिंदू आणि बौद्ध धर्माचा छुपा प्रचार आहे असा आरोप केला जातो.तेथील योग प्रसारक देखील हा आरोप नाकारून योग हा एक व्यायाम आहे असा प्रचार करतात आणि योगिक तत्वज्ञानावर अधिक भर न देता प्रत्यक्ष कृती महत्वाच्या मानल्या जातात.मुस्लीम देशात या कृतींमध्ये हि काही बदल केले जातात.ओंकार चा उच्चार टाळला जातो,सूर्यनमस्कार घालताना नमस्कार मुद्रेचा आग्रह धरला जात नाही.इराण मध्ये योग हा एक खेळ म्हणूनच ओळखला जातो.तेथे योगा फेडरेशन हे टेनिस किंवा फुटबॉल फेडरेशन सारखे काम करते.
युरोप,अमेरिका,चीन,ओस्ट्रेलिया या समृद्ध देशात एक खेळ,जीवनशैली,पर्यायी चिकित्सा म्हणून योगाचा वेगाने प्रसार होत आहे.मात्र तिसरे जग म्हणून ओळखल्या जाणार्या आफ्रिकेमध्ये वेगळी परिस्थिती आहे.पाश्चात्य देशात योगाचा अनुभव घेतलेले काही जण त्यांच्या मायदेशी परततात तेव्हा तेथे योगा स्टुडीओ सुरु करतात,पण त्यांना मिळणारा प्रतिसाद हा अजूनतरी खूप कमी आहे.आफ्रिकेतील घाना या देशामध्ये मात्र योग हा हिंदुधर्माचा भाग म्हणूनच शिकवला जातो.त्याचे सर्व श्रेय घनानंद सरस्वती यांना जाते.हे ३७ साली घानामध्ये एका ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले.वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी आंतरिक ओढीने प्रार्थना,ध्यान अशी आध्यात्मिक साधना सुरु केली.त्यानंतर आठ वर्षांनी त्यानी हिंदू वे ऑफ लाईफ या नावाने सुरु असलेला डिव्हाईन लाईफ सोसायटी,हृषीकेश यांचा एक कोर्स केला.त्याची ओढ लागल्याने ७० साली ते भारतात आले.दोन वर्षे हृषीकेश येथे राहिले आणि त्यानंतर घानामध्ये जाऊन त्यांनी हिंदू मोनास्ट्री सुरु केली.स्वामी कृष्णानंद सरस्वती हे त्यांचे गुरु,ते ७५ मध्ये घानामध्ये गेले आणि त्यानी तेथे याना घनानंद असे नामकरण करून अधिकृत दीक्षा दिली.तेव्हापासून घनानंद सरस्वती घाना देशातील पाच शहरात हिंदुधर्म आणि योग यांचा प्रसार करीत होते. तेथील २५०० कुटुंबांनी हिंदुधर्म आणि योगिक जीवनशैली स्वीकारली आहे.या स्वामींचे याच वर्षी फेब्रुवारी मध्ये निधन झाले तरी त्यांचे शिष्य त्यांचे कार्य पुढे चालवीत आहेत.
आफ्रिकेमध्ये योगाचा प्रसार अन्य मार्गांनी देखील होत आहे. http://www.africayogaproject.org/ या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेमध्ये ८० शहरात ३०० योगकेंद्रे चालवली जातात आणि त्यामध्ये २०० तरुण योगशिक्षक म्हणून काम करतात. केनिया मधील नैरोबी येथील केंद्र सर्वात प्रभावी असून तेथे सहा हजार माणसांनी योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. अशाप्रकारे आज जगातील सर्व खंडातील माणसे कोणत्या ना कोणत्या कारणाने योगाशी जोडली गेली आहेत.या सर्वांच्या दृष्टीने योगाचा उगम भारतातील असल्याने भारतात येऊन योग शिकणे हे या सर्वांचे एक स्वप्न असते. अय्यंगार इन्स्टिट्यूट पुणे,बिहार स्कूल ऑफ योगा मुंगेर,परमार्थ निकेतन हृषीकेश,शिवानंद सेंटर त्रिवेंद्रम,योगा इन्स्टिट्यूट सांताक्रूझ मुंबई,योगविद्या गुरुकुल नाशिक,कैवल्यधाम लोणावळा अशा अनेक ठिकाणी जगभरातील शेकडो तरुण तरुणी योगशिक्षक होण्यासाठी येऊन राहतात,योगाची साधना करतात,योग कसा शिकवायचा ते शिकून घेतात आणि आपापल्या देशात जाऊन योगा स्टुडिओ सुरु करतात.त्यांच्यासाठी योग हि रोजगाराची एक संधी आहेच पण ती एक जीवनशैली आहे.हि जीवनशैली त्यांनी त्यांच्या देशात असतानाच स्वीकारलेली असते,ती त्यांना आवडलेली असते,त्याचा त्यांना त्यांच्या आयुष्यात लाभ झालेला असतो.त्यामुळे अनेक जण आपली पूर्वीची नोकरी सोडून देतात आणि योग शिक्षक म्हणून नवीन करिअर स्वीकारतात.या सर्व देशात भारतीय योग शिक्षकांना वेगळा सन्मान आहे.आपण भारतीयांनी हे समजून घेऊन योगाभ्यास अधिक गांभीर्याने करायला हवा.या क्षेत्रात झोकून देऊन काम करायला हवे अन्यथा काही वर्षांनी परदेशी योगशिक्षक येथे येऊन योगास्टुडीओ सुरु करतील आणि त्यांची थेरपी भारतीय पैसे घेऊन देतील.