समाजात विज्ञानाची रुजवात गरजेची

विवेक मराठी    26-Dec-2016
Total Views |

मराठी विज्ञान परिषद गेली 51 वर्षे समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. याचे द्योतक म्हणजे नुकतेच ठाण्यात झालेले 51वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन. 1966 साली स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषदेने पहिले अधिवेशन अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीत घेतले आणि 1967 साली मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाची स्थापना झाली. त्यामुळे सन 2016-17 हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून ठाणे विभाग साजरे करीत आहे.
राठी विज्ञान परिषद गेली 51 वर्षे समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. याचे द्योतक म्हणजे नुकतेच ठाण्यात झालेले 51वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन. 1966 साली स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषदेने पहिले अधिवेशन अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीत घेतले आणि 1967 साली मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाची स्थापना झाली. त्यामुळे सन 2016-17 हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून ठाणे विभाग साजरे करत आहे. शुक्रवार ते सोमवार दिनांक 16-19 डिसेंबरपर्यंत झालेल्या या अधिवेशनाला पहिल्या दिवशी विज्ञान दिंडीने सुरुवात झाली. 4000 विद्यार्थ्यांच्या साक्षीने संमेलनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील निरनिराळया शाळांमधून घोषणा देत विज्ञान दिंडी सुरू झाली. या दिंडीने ठाणे परिसरातील वातावरण विज्ञानमय करून टाकले होते. पथनाटय, वेषभूषा करून मेरी क्युरी, एडिसन, सुनीता विल्यम्स, डॉ. अब्दुल कलाम, सी.व्ही. रामन यांचे चरित्र उलगडत होते. निसर्गाचे संतुलन माणसाने कसे बिघडवले याचा आलेख सर्व जनतेसमोर मांडण्यांचा प्रयत्न हे बालवैज्ञानिक करत होते. आता तरी जनतेने शहाणे व्हावे आणि प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा विनाश अटळ असल्याचे पथनाटयातून सांगितले जात होते. दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये दिंडीचा समारोप झाला आणि या विद्यार्थ्यांना इस्रोच्या अर्थात अवकाश तंत्रज्ञानाच्या मोहिमेची भेट घडवून आणली ती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी - डॉ. माधव ढेकणे, सुरेश नाईक, डॉ. शंतनू भाटवडेकर यांनी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी. कॉलेज ऑॅफ इंजीनिअरिंग, पुणे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नुकताच 'स्वयं' नावाचा उपग्रह अवकाशात सोडून एक सुखद धक्का दिला आणि आजही हा उपग्रह कार्यरत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. वीज न वापरता या उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थिर करणे हा उद्देश होता. डॉ. माधव ढेकणे यांनी गेल्या 52 वर्षांत इस्रोचा प्रवास कसा घडला, याची पार्र्श्वभूमी सांगत विविध मोहिमा विज्ञानप्रेमींसमोर मांडल्या. 21 नोव्हेंबर 1963 रोजी भारताने 'निकी ऍपाची' हे पहिले रॉकेट थुंबा येथून सोडले. डॉ. विक्रम साराभाई यांनी अनेक भारतीय शास्त्रज्ञांना एकत्रित करून थुंबा येथील अवकाश संशोधन केंद्र सुरू केले. यात डॉ. वसंतराव गोवारीकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. सतीश धवन यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्धशतकाहून अधिक कालावधीत एकूण 84 उपग्रह, 59 प्रमोचन यान, 8 शैक्षणिक उपग्रह आणि 79 विदेशी उपग्रह इस्रोने अवकाशात सोडले. यामुळे भूनिरीक्षण, घरांचे नकाशे, समुद्रातील नैसर्गिक साधनसामुग्री इ. गोष्टींची माहिती घेणे सोपे झाले आहे. ASLV, PSLV, GSLV आणि GSLV Mark III अशी मालिका आजपर्यंत पुढे पुढे जात आहे.  असून आपला देश मंगळयान मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करणारा भारत हा पहिला एकमेव देश आहे. आपले शास्त्रज्ञ हे काम करू शकणार नाहीत असा पाश्चात्त्य देशांचा गैरसमज होता. परंतु आपल्या शास्त्रज्ञांनी कमी खर्चीक तंत्रज्ञान शोधून आज भारताचा तुरा सन्मानाने रोवला असल्याचे सांगितले. भविष्यात अचूकतेला महत्त्व, कमी खर्चीक आणि एका वेळी अधिकाधिक उपग्रह अवकाशात सोडणे, सुमारे 4 ते 10 हजार किलो वजनाचा उपग्रह भूस्थिर कक्षेशी जोडण्याची क्षमता निर्माण करणे यावर भर देण्याचा प्रयत्न असेल.

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी या संमेलनाचे उद्धाटन केले. ''देश स्वतंत्र होऊन 69 वर्षांचा कालावधी उलटला, पण देशातील गरिबी, अज्ञान, अंधश्रध्दा यातून आपण बाहेर पडलो नाही.'' यातून बाहेर पडण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थेने पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ''विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून आपण पुढे आलो, तर आपला देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. थोर गणिती भास्कराचार्य यांचे महाराष्ट्राला भूषण असून पुढील अधिवेशन पाटणा येथे घ्यावे, तसेच विज्ञान महोत्सवासारख्या कार्यक्रमांचीही सुरुवात व्हायला हवी'' असेही राज्यपालांनी सांगितले. या प्रसंगी अर्धशतकाचा इतिहास मांडणारे 'मराठी विज्ञान परिषद - नाबाद 51', तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाच्या अध्यक्षा सुलक्षणा महाजन यांनी शहरीकरणाच्या प्रश्नावर भर दिला. दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक, बांधकामे, प्रदूषण आणि येणारे लोंढे हे शहराचे प्रश्न असून शहरे आणि शहरीकरण याचा जगभर विचार सुरू झालेला असून यावर आधारित 'अर्बन सायन्सेस' ही नवीन शाखा उदयास आलेली आहे. मुंबईतील काही संस्थांमध्ये याविषयीचा अभ्यास सुरू असून यावर संशोधनाची सोयही उपलब्ध झाली आहे, पण हे प्रयत्न मात्र अत्यल्प असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे असून सर्वच प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवता येतीलच असे नाही. अशा प्रश्नांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय  संबंध सोडता पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विचार केला गेला, तर स्मार्ट, सुंदर, स्वच्छ शहरे आपल्याला घडवता येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पूर्वी पारंपरिक पध्दतीने वसाहतीत राहणारे लोक एकमेकांची अनेक कामे एकत्रित करत, त्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होत असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही प्रगल्भ झाले, तरी त्यांचे परिणाम परिसरानुरूप बदलतात असा आजवरचा अनुभव. राजकीय नेत्यांना शहराचे अथवा विज्ञानाचे भान नाही आणि ज्या तज्ज्ञांना भान आहे त्यांना विचारले जात नाही, ही विकृती समाजात आजही दिसून येत आहे. एकविसाव्या शतकातील दशके तंत्रज्ञानावर आधारित असतील. त्यांचे स्वागत करताना आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला तयार करावी लागेल. औद्योगिक क्रांतीच्या काळात सत्तेचे केंद्रीकरण अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वर्तमान समस्या सोडवताना धाडसी आणि आक्रमक धोरणांमुळे सर्व प्रश्न एकाच वेळी सुटणार नाहीत. तसे करण्याचा प्रयत्न म्हणजे विपरीत परिणामांना सामोरे जाण्यासारखे होईल. काही दशकांपूर्वी अमेरिकेत रासायनिक खतांची, कीटकनाशकांची फवारणी विमानातून केली जात असे. निसर्गावर आणि माणसाच्या आरोग्यावर त्याचे घातक परिणाम झाले, त्यामुळे हे तंत्रज्ञान बाद करावे लागले. थोडक्यात, सर्वच स्तरांवर समन्वय, सहकार्य, सहभाग आणि एकमेकांची भाषा समजून घेणे आवश्यक असल्याचे श्रीम. महाजन यांनी सांगितले. डॉ. अनिल काकोडकर या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांनी आपले विचार मांडताना ''ठाण्यात विज्ञान केंद्राची उभारणी व्हावी म्हणजे ते शाश्वतेचे आणि विकासाचे पाऊल असेल'' असे सांगितले. उद्धाटन कार्यक्रमानंतर 'स्मार्ट सिटी, स्वच्छ, सुंदर, हरित व स्मार्ट शहर' असा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. डॉ. रविकांत जोशी, डॉ. पल्लवी लाटकर, डॉ. सुधीर पटवर्धन, मयुरेश भडसावळे यांनी या परिसंवादात आपली मते मांडली. पर्यावरणाच्या परिसंवादात डॉ. संजय देशमुख यांनी खाडयांमध्ये टाकला जाणारा कचरा, मूर्तींचे विसर्जन, निर्माल्य हे कसे टाळता येऊ शकेल, आज ठाण्यातील तलाव कसे स्वच्छ केले त्यासाठीचे सोपे पर्याय, माशांची झालेली वाढ याबद्दल त्यांनी प्रेक्षकांना सांगितले. अतुल देऊळगावकर यांनी मराठवाडयातील व विदर्भातील वास्तवता विशद करून पाण्याचा प्रश्न किती गंभीर असल्याचे सांगितले. अभिजीत घोरपडे यांनी आपला परिसर किती छान आणि नैसर्गिक साधनसामग्रीने बहरलेला आहे याविषयी सांगितले. दगडांचे अनेक नमुने, त्याची खासियत आणि परदेशातील लोकांना त्याविषयी कळालेले महत्त्व विशद करून आपल्या परिसरांकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघण्याचे आवाहन केले. दिवसाच्या संध्येला संदेश विद्यालय विक्रोळीच्या विद्यार्थ्यांनी 'विज्ञान-सुखी जीवनाचा धागा' ही विज्ञान एकांकिका सादर केली. तिसऱ्या दिवशी ओ.एन.जी.सी., महानगर गॅस यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. 'विज्ञान शिक्षणातील वेगळया वाटा' यात सुषमा पाध्ये, डॉ. विवेक सावंत,  योगेश कुळकर्णी, प्रा. गणपती यादव, प्रा. ज्येष्ठराज जोशी, प्रा. रमेश पानसे यांनी सहभाग दिला. एकूण शिक्षण पध्दतीत सुधारणा, तीन वर्षांपर्यंत बालकांना शाळेत जाण्याचा आग्रह नको, कौशल्य विकसित करणाऱ्या शिक्षणाची गरज, विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरून देशाचे उत्पन्न कसे वाढवता येईल याविषयी ऊहापोह करण्यात आला. अधिवेशनातील शेवटचा परिसंवाद हा 'सक्रिय समाधानी संध्याकाळ' हा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर आधारित होता. डॉ. संजय ओक यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन करून ही संध्याकाळ हलकी केली. वेगवेगळी उदाहरणे आणि त्यातून आपण काय करायला हवे, कसे वागायला हवे, कशी मानसिकता तयार करायला हवी यावर भाष्य करून हा परिसंवाद रंगवला. अधिवेशनाला मराठी विज्ञान परिषदेचे विश्वस्त डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष डॉ. जे.बी. जोशी, कार्यवाह अ.पां. देशपांडे, ठाणे विभागाचे अध्यक्ष डॉ. ह. शा. भानुशाली, कार्यवाह ना.द. मांडगे उपस्थित होते.

 9869065547

मराठी विज्ञान परिषद, मुंबइ©