आनंदी आनंद गडे....

विवेक मराठी    30-Nov-2016
Total Views |

खरं म्हणजे मज्जा, आनंद, समाधान ही आपल्या जगण्याचीच बैठक आहे. मग तो भौतिक आनंद असो, सिनेमा-नाटक पाहणं असो, पार्टी, हॉटेलिंग असो, एखादी टूर असो... आपण आनंद शोधण्यासाठीच तर करतो हे सगळं. तसाच आपल्या आवडीचा विषय, त्याचा अभ्यास, लेखन, चिंतन, एखाद्या चॅलेंजिंग प्रकल्पावर काम, विविध कलांचं शिक्षण आणि त्यांचा रियाज या सगळयाची बैठक आनंद असली पाहिजे, असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर दडलेला असतो.
मा
गच्या एका विवेकमधल्या 'कवडसे'मधील सत्यकथेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक फोन आले, फेसबुक, व्हॉट्स ऍप सगळीकडून भरपूर प्रतिसाद! कशी गंमत आहे नाही, 'एखादा मृत्यू' आपल्याला कसा खडबडून जागा करतो.... त्यात ते एखादं लहान अजाण मूल असावं - आपण अंतर्बाह्य हलून जातो. 'अरेरे!' 'चुकचुक' 'काय हे?' 'काय ही परिस्थिती'.... इत्यादी इत्यादी. खरं सांगू मंडळी, पालक-बालक संदर्भात जितकं म्हणून मी 'कवडसे'मध्ये लिहिते आहे, ते सर्व सत्यच असतं. ते गेल्या वीस वर्षांत लहान मुलांच्या विश्वात वावरताना, त्यांना जवळून पाहताना, त्यांना समजून घेताना मी अनुभवलेलं वास्तवच आहे. त्यातही मला खेदाने सांगावंसं वाटतं की स्वत:च्याच लहान मुलांच्या मनातला निखळ, निर्भेळ आनंद ही अनेक पालकांच्या मनाला न आकळलेली गोष्ट आहे की काय, अशी शंका यावी असे अनेक छोटे-मोठे प्रसंग प्रत्यही समोर येत असतात.

''रिमा, तुझ्या सानूची नोटबुक भरलीसुध्दा? काय करू गं, प्रांजल काही लिहीतच नाही. मला तर सॉलिड टेन्शन येतं! मी त्याला सारखं सांगते, पण ऐकतच नाही अगं!'' यावर रिमा म्हणते, ''रिटा, काही नाही गं, तिला मी रोज लिहिल्याशिवाय ब्रेकफस्टच देत नाही.'' ''.... तुझं बरं आहे गं, तुझी मुलगी आहे. बॉईज ऐकतात का? रडून धुमाकूळ घालतो. ऐकतच नाही गं, तरी आज कशातरी मी त्याच्याकडून स्टँडिंग लाईन्स आणि स्लीपिंग लाईन्स काढून घेतल्या''... रिटा म्हणाली.

....???.... ?? अगदी बरोबर ओळखलंत! हा संवाद आहे चार वर्षांच्या दोन मुलांच्या सुविद्य 'High Standard' मातांमधला! आपल्या मुलांकडून हा so called अभ्यास आनंदाने करून घेण्याची कितीतरी आयुधं पालकांच्या भात्यात असायला हवीत. थोऽऽडं डोकं चालवलं, तर ते शक्यही आहे. पण स्वत:च्या करियरबद्दल अत्यंत आग्रही असणाऱ्या या मॉम्स इतक्या कन्फ्यूज्ड असतात की जरा शांत बसून असा काही विचार करावा हेही बहुधा त्यांना सुचत नाही. 'एकदाचा उरका पाडणं' यात मुलांचा अभ्यासही येतो. मुलांचा अभ्यासच नाही, तर मुलाचं वाढणं हाही पालकांसाठी ताणाचा विषय असतो. आनंदाचा नसतो का? ... असतो तर! पण जरुरीपेक्षा जास्त घेतल्या जाणाऱ्या या ताणाचं पारडं आनंदापेक्षा बरंच अधिक जड होत जातं आणि मग ताणाची पुटं आनंदभावनेला ग्रासून टाकतात. कसले असतात हे ताण? कसली जळमटं साठलेली असतात मनात? कोणत्या ताणाची पुटं असतात? हे ताण असतात विविध प्रकारचे. त्यातला महत्त्वाचा ताण असतो वेळेच्या नियोजनाचा! दुसरा ताण असतो व्यक्तिगत प्रगतीचा! तिसरा ताण असतो समाजाच्या बरोबरीने धावण्याचा! आणि कित्येकदा हे धावणंही आपण स्वत:वर लादून घेतलेलं असतं.

गेल्या वर्षी सुकन्याची तीन वर्षांची मुलगी कलांगणमध्ये गाणं शिकायला यायला लागली. सुकन्या स्वत: उत्तम गाणारी. तिचा नवराही संगीताच्या क्षेत्रातलाच! मुलगी गाणं घेऊनच जन्माला आलेली! तीन वर्षांची इतकी सुरेल आणि खणखणीत स्वर असलेली मुलगी फार क्वचितच भेटते... एक वर्षभर गाणं शिकून झालं. आधी जरा कुरकुरणारी मुलगी मग छान रुळली. स्वस्थ बसणं तसं तिच्या स्वभावातच नव्हतं. या वयाची मुलं नसतातच स्थिर... पण ही जरा जास्त अस्थिर! पण जे जे शिकवलं, ते ते तिला सगळं उत्तम अगदी सुरात यायचं! पण सुकन्याचा या वर्षी निरोप आला की तिची मुलगी या वर्षी कलांगणमध्ये येणार नाही. मला आश्चर्य वाटलं, थोडं वाईटही! मी सुकन्याला फोन केला, तेव्हा ती म्हणाली, ''सोनी एका जागी अजिबात बसत नाही गं, म्हणून मी तिला या वर्षी बॅले शिकायला पाठवते. कराटेला पाठवते आणि तिच्याबरोबरची खूप मुलं काय काय करतात म्हणून पियर प्रेशरमुळे अमुक तमुक क्लासेसनाही पाठवते. इतके क्लासेस झालेत, आता गाण्याला वेळच नाही.'' मुलीचं वय वर्षं चार! आणि क्लासेस चाळीस! बरं, एवढं करून जी गोष्ट मुलीच्यात अंगभूत आहे, त्याचं शिक्षण नाहीच! त्यातही जे गाणं स्थैर्याकडे नेतं, एकाग्रता देतं, त्याच्याशी फारकत आणि इतर मुलं करतात म्हणून कुठल्या कुठल्या क्लासेसना पाठवण्यात - पोहोचवण्यात, आणण्यात आपला मौल्यवान वेळ खर्च करायचा. त्यात ना धड आनंद, सतत मन शंकित! बरोबर चाललेलं नाही हे आतून कळत असतं! पण सगळे करतात, तेच केलं की खोटं खोटं समाधान मिळवल्याचा खोटा खोटा आनंद!

खरं म्हणजे मज्जा, आनंद, समाधान ही आपल्या जगण्याचीच बैठक आहे. मग तो भौतिक आनंद असो, सिनेमा-नाटक पाहणं असो, पार्टी, हॉटेलिंग असो, एखादी टूर असो... आपण आनंद शोधण्यासाठीच तर करतो हे सगळं. तसाच आपल्या आवडीचा विषय, त्याचा अभ्यास, लेखन, चिंतन, एखाद्या चॅलेंजिंग प्रकल्पावर काम, विविध कलांचं शिक्षण आणि त्यांचा रियाज या सगळयाची बैठक आनंद असली पाहिजे, असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर दडलेला असतो. कुठलंही एखादं काम किंवा गोष्ट जर आपल्या मनाला आनंद देत नसेल, जुलमाने करावी लागत असेल तर त्या कामाला आपल्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ तरी लागतो, किंवा आपण ते करण्याची चक्क टाळाटाळ करतो, हा अगदी साधा सरळ नियम आहे. मोठं झाल्यावर आपण स्वयंपूर्ण असतो, जे आपल्याला आवडेल, पटेल ते करण्याची मुभा असते आपल्याला! पण आपली मुलं... त्यांनी मात्र आपण जे सांगू ते ऐकायचं असतं. तुम्ही म्हणालं, अर्थातच! आपणही लहानपणी हेच केलेलं असतं. अगदी बरोबर! पण आठवून पाहा! कित्येक वेळेला मला हे करायचं होतं, पण बाबांच्या धाकामुळे मला अमुक करावं लागलं, असा एक आतला आवाज आपल्याकडे तक्रार करतोच की नाही? पालक मुलांचं हितच बघत असतात यात काहीच शंका नाही. पण तेच हित आपण मुलांसाठी आनंददायक पध्दतीने त्यांच्या कलाने घेत पाहिलं, तर....

मध्यंतरी एका गावात अगदी छोटया - म्हणजे शिशु, बालवर्गातल्या आणि काही पहिलीतल्या मुलांची चार, पाच दिवसांची एक कार्यशाळा अतिशय उत्साही आणि आनंद शिक्षणाचे विविध प्रयोग करणाऱ्या आमच्या एका मैत्रिणीने घेतली होती. त्या दिवसात तिने काही सुंदर गाणी, बडबडगीतं, चित्रं, क्राफ्ट यांच्याशी मुलांची ओळख करून दिली. या काळात सगळी मुलं त्या ताईला आणि तिला मदत करणाऱ्या इतर तायांनाही मस्त चिकटली. कार्यशाळा संपली, तेव्हा ताईने सांगितलं की ''गेले चार-पाच दिवस आम्ही खूप मजा केली. आमची या मुलांशी खूप गट्टी जमली. मुलांना गाणी गाताना, क्राफ्ट करताना, चित्रं काढताना खूप खूप आनंद मिळाला.''

ही कार्यशाळाच मुळी मुलांना काही नवीन कळावं, माहीत व्हावं आणि आनंद मिळावा यासाठी होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की त्या छोटया मुलांच्या सर्व पालकांनाही मुलांना मिळणाऱ्या आनंदाचं विशेष अप्रूप वाटलं. ताईने केलेले श्रम पालकांना समजून घेता आले, याचं मला फार कौतुक वाटलं. तिची तळमळ, मुलांच्यात काहीतरी रुजवण्याची धडपड हे सगळं समजण्यात पालक यशस्वी ठरले. त्या चिमुकल्या मुलांची चित्रं, क्राफ्ट काहीच फार विशेष होते असं नाही; पण मुलांचं वय, त्यांची समज आणि त्यांच्या जाणिवा विकसित करण्याचे शिक्षिकेचे प्रयत्न पालकांना उमजले आणि त्यांनी तिचं विशेष कौतुक केलं. ''असा खूप आनंदच देतो मुलांना नवं काही शिकण्याची ऊर्मी!'' सत्तरीचे एक आजोबा कौतुकाने म्हणाले आणि शिक्षिका आनंदून गेली. त्या पालकांच्या वाक्यालाच तिने पाया बनवलं आणि 'कलाशिक्षणाचा पहिला उद्देश म्हणजे आनंद! अपूर्व आनंद!'  हे तिने आपल्या सहज शिक्षण पध्दतीचं ध्येय मानलं. आज तिच्या या उत्स्फूर्त आनंद देणाऱ्या कलाशिक्षणाचं महत्त्व अनेक पालकांना मनापासून पटलं आहे. शेवटी जे खरं असतं, सत्त्वयुक्त असतं, ते रुजतंच! मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रामाणिक कल्पना ज्या पालकांच्या मनात स्पष्ट असतात, ते स्वत:ही अशा शिक्षणाचा पुरस्कार करतात. थोडी वाट बघावी लागते, विश्वास ठेवावा लागतो, पण पालक आणि शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून मूल दूरगामी सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करू लागतं...

9594962586

kalavarshab@gmail.com