हक्कानी आपल्या पुस्तकात एका पाकिस्तानी ब्रिगेडियरचे मनोगत देतात. त्या ब्रिगेडियरच्या मते पाकिस्तानी जनतेची दैन्यावस्था भारतामुळे आली आहे. पाकिस्तानातील तरुण पिढी पुरेशा शिक्षणाअभावी हलाखीत दिवस काढत आहे. तो जेव्हा ग्रामीण भागात जातो, तेव्हा त्या भागातील दुरवस्था पाहून त्याला रडू येते. त्यासाठी भारतच जबाबदार असल्याने कसेही करून भारताचा पराभव केल्याशिवाय पाकिस्तानला गत्यंतर नाही आणि त्यासाठी अण्वस्त्रे वापरण्याची आवश्यकता पडल्यास तीसुध्दा वापरावी, असे प्रस्फोटक विधान त्याने केले.
भारताच्या इतिहासात 26 नोव्हेंबर 2008 हा एक काळा दिवस म्हणून नमूद झाला आहे. ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि इतर दोन ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या अमानुष कारवायांमुळे ते तीन अघोरी दिवस लोकांच्या स्मरणात राहतील. तेथे आलेल्या अतिरेक्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत हाती लागल्याने या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता हे एकशे एक टक्के प्रस्थापित झाले असले, तरी आजवर पाकिस्तानने त्याबाबत कारवाई करण्यास, तो हल्ला करण्यात ज्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे खटला चालविण्यास टाळाटाळच केली आहे. या हल्ल्यासंदर्भात भारताने आजवर दिलेले पुरावे पुरेसे नाहीत, विश्वासार्ह नाहीत असे सांगून पाकिस्तानने त्याचे नियोजन करणाऱ्या अतिरेकी मुखंडांना मोकाट सोडले आहे. त्यामागची कारणमीमांसा आता एका पाकिस्तानी मुत्सद्दयानेच जगासमोर मांडली आहे. त्यातून पाकिस्तानी शासन व्यवस्थेचे, तिच्या भारतद्वेषाचे मूळ समजण्यास मदत होणार आहे.
हक्कानींचे आत्मसंशोधन
हुसैन हक्कानी हे आंतरराष्ट्रीय राजकारणात - विशेषतः दक्षिण आशिया खंडाच्या संदर्भात एक गणमान्य व्यक्ती आहेत. ते बरीच वर्षे पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवेत होते. ते अनेक देशांमध्ये - विशेषतः अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत होते. त्यांच्या परराष्ट्रीय सेवेतील कारकिर्दीदरम्यान तीन पंतप्रधान होऊन गेले. त्यांचे निर्णय, भारताकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि त्यांच्यावर होत असलेला पाकिस्तानी सैनिकी यंत्रणेचा दबाव इ. गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या. आता ते पाकिस्तानच्या परराष्ट्रसेवेतून निवृत्त होऊन अमेरिकेतीलच एका परराष्ट्रविषयक धोरण अभ्यासणाऱ्या संस्थेत काम करत आहेत. हक्कानी हे एक पत्रकार आणि चांगले लेखक आहेत. त्यांची भारत-पाक संबंधातील पुस्तके त्यातून येणाऱ्या प्रत्यक्षदर्शी माहितीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील व्यावसायिकांनी, तसेच या विषयासंदर्भात काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभ्यासकांनी नावाजली आहेत. एक गोष्ट निश्चित की हक्कानी हे स्वातंत्र्योत्तर काळातले आणि जन्मापासून पाकिस्तानी असल्याने त्यांचे लिखाण हे पाकिस्तानच्या विचारवंतांच्या लेखणीतून उतरल्यासारखे असते. एक गोष्ट नमूद केली पाहिजे की त्याचा लिहिण्याचा दृष्टीकोन हा पाकिस्तानी नागरिकाचा जरी असला, तरी लिखाणात मात्र ते जास्तीत जास्त तटस्थच नव्हे, तर अनेकदा आत्मसंशोधन करताना अंतर्मुख होतात. त्यांचे नुकतेच प्रसिध्द झालेले पुस्तक - India vs Pakistan (2016) Juggernaut Books. हे भारत-पाकिस्तान परस्पर संबंधांचा थेट मागल्या शतकातील घटनांच्या पार्श्वभूमीचा आढावा घेताना दिसते. त्याची मांडणी करताना एका पाकिस्तानी नागरिकाच्या दृष्टीतून ते लिहिले आहे, हे जाणवते.
भारत-पाक संघर्षांचा आढावा
हक्कानी आपल्या पुस्तकात भारत पाक-संघर्षाचा आढावा घेताना पाकिस्तानी पुढाऱ्यांच्या आणि विशेषत: पाकिस्तानी सैनिकी यंत्रणेच्या भारताकडे पाहण्याच्या दृष्टीवर भर देतात. 1965 साली पाकिस्तानी हुकूमशहा अयुब खानने प्रत्यक्ष सैनिकी कारवाई न करता काश्मीरमध्ये घुसखोर पाठविले. त्या वेळी पाकिस्तानी जनतेला उद्देशून भाषण करताना जिहादचा नारा दिला होता आणि भारताची शस्त्रास्त्रे म्यान होईपर्यंत लढत राहण्याचे आव्हान केले होते. - ''Will not rest till India's guns are silenced.'' (पृ. 32). झाले उलटेच. पाकिस्तानी प्रतिकार थंडावला. एक मुस्लीम सैनिक दहा हिंदू सैनिकांना पुरून उरेल ही दर्पोक्ती खोटी ठरली. त्यामुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी पाकिस्तानी वृत्तपत्रांतून आणि प्रसारमाध्यमांमधून लढाईदरम्यान आकाशातील हिरव्या पोषाखातील देवदूतांनी भारताने डागलेली क्षेपणास्त्रे, बाँब हे स्वत:च दुसरीकडे भिरकावून देण्याची वृत्ते प्रसारित करण्यात आली. (पृ. 32).
1971च्या लढाईत बांगला देश स्वतंत्र झाला आणि 90,000 पाकिस्तानी सैनिक शब्दश: शरण आले. त्या शौर्याचे श्रेय पाकिस्तान्यांनी हिंदूंना देण्याऐवजी गैरहिंदूंना वेगळे काढून दिले. त्या सैन्याचे सेनापती जन. माणेकशा हे पारशी, तर सैन्याला शरणागती पत्करावी लागल्यास भाग पाडणारे जन. अरोरा हे शीख होते, ही गोष्ट ठासून सांगण्यात आली. एवढे सर्व झाल्यावरसुध्दा पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झुल्फिकार अली भुट्टोंची इंदिरा गांधींशी वागणूक अत्यंत अरेरावीची होती. चर्चेदरम्यान इंदिरा गांधींनी काश्मीर प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी 90,000 सैनिकांच्या बदल्यात काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रस्ताव मांडून त्या वेळी जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असेल ती स्वीकारावी, असा प्रस्ताव मांडला होता. भुट्टोंनी तसे करण्यास सपशेल नकार दिला. काश्मीर प्रश्न असा सहजासहजी सुटणे लष्कराला आवडणारे नव्हते, असे भुट्टोंनी स्पष्ट केले. अशा वेळी केवळ त्याला पाकिस्तानात काळे तोंड घेऊन जावे लागू नये, असे वाटून इंदिरा गांधींनी सिमला करार केला. भुट्टोकडून काहीही भरघोस मागून न घेता विजयी झाल्याप्रमाणे जाऊ दिले. त्यातून भुट्टोंचे हात बळकट होऊन पाकिस्तानात लोकशाही बळकट होईल, अशी इंदिराजींना आणि त्यांच्या सल्लागारांना भाबडी आशा होती. त्यानंतर भुट्टोने अण्वस्त्रे तयार करण्यास सुरुवात केली. इस्लामी बाँबची हाळी दिली. वहाबी इस्लामी कट्टरतेबरोबरच हिंदू-काफीरद्वेषाचे पीक मोठया प्रमाणावर उगविले. त्याची कटू फळे आज केवळ भारत-पाकच नव्हे, तर अफगाणिस्तान आणि बांगला देश हे देशसुध्दा चाखत आहेत. दक्षिण आशियावर त्याचे अप्रत्यक्षपणे सावट आहे.
अधोगतीचे खापर भारतावर
पाकिस्तानी लष्कराकडून आणि राजकारण्यांकडून पाकिस्तानातील दैन्य-दुरवस्था यांच्यासाठी भारताला कारणीभूत धरले जाते. हक्कानी आपल्या पुस्तकात एका पाकिस्तानी ब्रिगेडियरचे मनोगत देतात. त्याच्या मते पाकिस्तानी जनतेची दैन्यावस्था भारतामुळे आली आहे. पाकिस्तानातील तरुण पिढी पुरेशा शिक्षणाअभावी हलाखीत दिवस काढत आहे. तो जेव्हा ग्रामीण भागात जातो, तेव्हा त्या भागातील दुरवस्था पाहून त्याला रडू येते. त्यासाठी भारतच जबाबदार असल्याने कसेही करून भारताचा पराभव केल्याशिवाय पाकिस्तानला गत्यंतर नाही आणि त्यासाठी अण्वस्त्रे वापरण्याची आवश्यकता पडल्यास तीसुध्दा वापरावी, असे प्रस्फोटक विधान त्याने केले. (पृ. 71-72). एकीकडे भारत अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही असे डांगोरा पिटून सांगत असला, तरी पाकिस्तानातील सैनिकी अधिकाऱ्यांमध्ये भयंकर वेमुर्वतपणा भरला असून ते अण्वस्त्रांचा वापर (पृ. 72) करण्याची धमकी देत आले आहेत. भारताने गेल्या महिन्यात शल्यक्रियात्मक हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी उच्च अधिकाऱ्याने ''पाकिस्तानजवळील अण्वस्त्रे ही शोभेच्या कामाची नाहीत'' असे उघडपणे सांगितले होते. त्यापूर्वी पाकिस्तानच्या प्रगतीत आणि स्थैर्यात आड येणारी गोष्ट पाकिस्तानातील अतिरेकी नसून 'भारत' आहे, भारत हाच पाकिस्तानला अस्थिर करणारा मोठा घटक आहे असे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने मार्च 2016मध्ये केल्याचे हक्कानी नमूद करतात. भारत-पाक संबंध कसे अधिकाधिक बिघडत गेलेत, त्याचा आढावा घेताना दोन्ही देशांनी एकमेकांना कसे खलनायक ठरविले याची चर्चा केली आहे. हक्कानींचा रोष सध्या त्याच्या मताप्रमाणे होत असलेल्या भगवीकरणावर अधिक आहे.
पाकिस्तानची खरडपट्टी
अमेरिकेचे राज्यकर्ते आणि अधिकारी सातत्याने पाक लष्करी अधिकारी आणि राज्यकर्ते यांची खरडपट्टी कसे काढत होते, याची उदाहरणे हक्कानी देतात. ते स्वत: अमेरिकेत राजदूत असल्याने त्या प्रसंगी त्यांची उपस्थिती आवश्यक असे.
हिलरी क्लिंटन यांनी पाकमध्ये जाऊन सुनावले होते की घरात साप पाळल्यावर ते फक्त शेजाऱ्यालाच चावतील असे होत नाही. अमेरिकेची महत्त्वाची अधिकारी, सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेल्या कोंडोलिझा राईस हिने पाकला खडसावले होते की तुम्ही तुमची शक्ती भारताच्या विरोधात फुकट खर्च करता. ती भलीमोठी (Colossal) चूक आहे. कारण तुम्हाला भारतापासून भीती नाही. अतिरेक्यांबरोबरच संबंध तुम्हाला कधीतरी तोडलेच पाहिजेत. (पृ.134). पाकिस्तानचे वहाबीकरण या सल्ल्याच्या आड येते.
या सर्वांवर कडी करणारा प्रसंग हक्कानी देतात. बदनाम आय.एस.आय.चा उपप्रमुख लेफ्ट.जन. अहमद शुजा पाशाची भेट सी.आय.ए.चा प्रमुख मायकल हायडेनबरोबर झाली. मायकेल हायडेनसमोर पाशाने 26/11च्या मुंबई हल्ल्याची आखणी करणाऱ्यांमध्ये काही निवृत्त लष्करी अधिकारी होते, याची कबुली दिली. पाशाच्या मते हल्लेखोरांचा आय.एस.आय.शी संबंध होता, पण याचा अर्थ असा नव्हे की आय.एस.आय.ने तो अतिरेकी हल्ला करण्यास त्यांना परवानगी दिली होती. त्या बैठकीत अशी चंपी झाल्यावर जेव्हा पाशा आणि हक्कानी घरी परतले, तेव्हा पाशाने हक्कानीला खास उर्दूतून सांगितले, ''लोग हमारे थे, ऑपरेशन हमारा नही था.'' त्यावर हक्कानींनी त्याला प्रतिप्रश्न केला, ''अगर हमारे लोग भी हमारी काबू में नही, तो आगे क्या होगा?'' या प्रश्नाचे उत्तर शोधायला पाहिजे, असे हक्कानी लिहितात. (पृ. 135). जगाला ते उत्तर मिळाले आहे. पाकिस्तानने पाळलेले साप आता त्याच्या घरातच घुसले आहेत आणि पाकिस्तानला त्याचे फळ भोगावे लागते आहे.
9975559155