व्याघ्राजिन

विवेक मराठी    06-Oct-2016
Total Views |

काल चाळीसगावला आमची उतरण्याची व्यवस्था केली होती, डॉ. हेमांगीताई पूर्णपात्रे यांच्या घरी. पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांच्या घरी पोचलो, तेव्हा पहिली नजर गेली ती प्रशस्त दिवाणखान्यात भल्यामोठ्या शोकेसमध्ये डिसप्ले केलेल्या अतिशय देखण्या व्याघ्राजिनांवर...आणि एकदम लक्षात आलं की, आपण सोनाली सिंहिणीची देखभाल करणा-या पूर्णपात्रे कुटुंबियाच्या घरी आलो आहोत. अगदीच अनपेक्षित होतं हे आमच्यासाठी, त्यामुळेच एकदम थ्रिलिंग वाटलं...सोनाली सिंहिणीचा सांभाळ करणारे डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे हे डॉ. हेमांगीताईंचे सासरे...पहाटेच्या वेळी घरी गेल्यामुळे
दिवसभरात सवड मिळेल तसं त्यांच्याकडून सास-यांच्या या आगळ्यावेगळ्या आवडीबद्दल जाणून घ्यायचं मनाशी ठरवलं.

त्यांच्या भल्यामोठ्या दिवाणखान्याचं मुख्य आकर्षण आहेत ही 3 व्याघ्राजिनं...काकासाहेबांच्या लहानपणी चाळीसगावच्या आजूबाजूला घनदाट जंगल होतं. भरपूर प्राणिसंपदा या जंगलात होती. कदाचित त्यातूनच काकासाहेबांना शिकारीचा छंद जडला असावा. त्यांच्यातल्या साहसी वृत्तीचं पोषण करणारा छंद...
एक दिवस या जातिवंत शिका-याच्या मनात विचार आला की जे उमदं जनावर आपण मारून वाजतगाजत मिरवणुकीने घरी नेतो...ते जिवंतपणी न्यायला अधिक धाडस लागेल. आणि त्याचं लालनपालन करण्यासाठी तर त्याहून अधिक. या विचाराने मूर्तरूप घेतल्यापासून त्यांच्यातला शिकारी लोप पावून त्यांच्यातला पालनकर्ता जागृत झाला. आणि या जाणीवेतून जंगली जनावर माणसाळवण्यासाठी त्यांनी घरी वन्य प्राणी पाळायला सुरुवात केली. राजा हा वाघ त्यांच्या घरी वाढला. पुरेसा मोठा झाल्यावर त्याला बोरीवलीच्या राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आलं.
सोनाली सिंहिण ही त्याच्यानंतरची. सोनाली सिंहिण, पामेरियन जातीची कुत्री रूपाली आणि काकासाहेबांची नात म्हणजे डॉ. हेमांगीताईंची मुलगी दीपाली या तिघींचा जन्म एकाच आठवड्यातला. तिघीही पुढची 2 वर्षं एकत्रच वाढल्या. 'माझी मुलगी सोनालीबरोबर खेळायची. तिच्या पाठीवर बसून घरात फिरायची. तिला किंवा आम्हांला कधी सोनालीचं भय वाटलं नाही.' हेमांगीताई म्हणाल्या. सोनाली 2 वर्षांची झाल्यावर तिला पुण्यात पेशवे पार्क इथे पाठवण्यात आलं.
या सोनालीचे काकासाहेबांबरोबरचे फोटो, तसंच त्यांच्या कारमध्ये एेटीत मागच्या सिटवर बसलेला रुबाबदार फोटो, आणि घरी पाळलेल्या वाघांचे फोटो शोकेसमध्ये पाहिले. त्याचबरोबर काकासाहेबांनी शिकारीसाठी वापरलेल्या बंदुकाही शोकेसमध्ये ठेवलेल्या आहेत. दर्शनी भागात भुसा भरलेला वाघ, त्याच्याखाली बंदूक आणि त्याच्याखाली 'साहसे श्री प्रति वसते' अशी पितळेची अक्षरं लावलेली आहेत.

सोनालीचे फोटो ज्या शोकेसमध्ये आहेत तिथेच 20 फुटी लांबी असलेल्या ढाण्या वाघाचं व्याघ्राजिन आहे.

ही तीनही व्याघ्राजिनं मौल्यवान आहेत. आज अशा संग्रहावर कायद्याने बंदी आहे. मात्र वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणून ही व्याघ्राजिनं सांभाळण्याची कायदेशीर परवानगी, तसं लायसन्स डॉ. सत्यजित पूर्णपात्रे - डॉ. हेमांगी पूर्णपात्रे यांचे चिरंजीव, यांच्याकडे आहे.
डॉ. सत्यजित यांच्या लहानपणी एक जखमी झालेला वाघ वैद्यकीय उपचारासाठी डॉ. पूर्णपात्रे यांच्या घरी पाठवण्यात आला होता. त्याच्यासाठी घराच्या आवारात एक भलामोठा पिंजरा उभारण्यात आला होता. या पिंज-यात ठेवलेल्या वाघावर पुढे दीडेक वर्ष काकासाहेब उपचार करत होते, त्यात लहानग्या सत्यजितचाही सहभाग असे..अशी आठवण डॉ. सत्यजित यांनी सांगितली.
वाघसिंहाची शिकार करणारा एक बहादूर शिकारी ते त्यांचं आस्थेनं लालनपालन करणारा तितकाच किंबहुना त्याहूनही बहादूर पालनकर्ता असं डॉ. वा.ग.उर्फ काकासाहेब पूर्णपात्रे यांचं अगदी ओझरतं दर्शन कालच्या भेटीने घडवलं.
कालचा दिवस एकूणातच अविस्मरणीय होता...