चाळीसगाव आणि केकी मूस हा अद्वैत समास आहे याची माहिती होती. पण कसं कोण जाणे, त्याचं विस्मरण झालं होतं. आज सकाळी डॉ. हेमांगी पूर्णपात्रे यांच्याशी गप्पा मारता मारता सहज विचारलं, " चाळीसगावमध्ये पाहण्यासारखी ठिकाणं कोणती?" तेव्हा त्यांनी पाटणादेवी अाणि केकी मूस
संग्रहालय असं सांगितलं. 'मूस संग्रहालय' नाव ऐकताक्षणी या कलावंताविषयी वाचलेलं सगळं मनात जागं झालं. जिवंतपणी आणि गेल्यानंतरही दंतकथा बनून राहिलेला हा अवलिया कलावंत. धनाढ्य पारसी कुटुंबात जन्मलेला, मुंबईतल्या करोडोच्या इस्टेटीवर पाणी सोडून, केवळ कलेची साथसंगत सुटू द्यायची नाही म्हणून चाळीसगावसारख्या खेड्यात(खरं तर त्या खेड्यातल्या बंगलीत) पूर्ण आयुष्य व्यतित करणारा....कलासाधना हे एकमेव जीवनध्येय मानलेला फकीरी वृत्तीचा कलावंत...त्याच्या गावात जाऊनही त्याच्या घराला...जे आता संग्रहालय म्हणून जपलं गेलं आहे, त्याला भेट न देणं हा करंटेपणाच ठरला असता.
संग्रहालयाला दिलेली भेट अधिक अर्थपूर्ण ठरली ती गायकवाड काकांनी दिलेल्या अनमोल माहितीमुळे...
कलेचा वारसा केकी मूस यांना त्यांच्या आईकडून मिळाला असावा. त्यांचे मामा विख्यात वास्तुशिल्पी तर आई विणकामासारख्या कलाकुसरीच्या कामात पारंगत. (त्यांच्या विणकामाचे नमुनेही मूस यांच्या चाळीसगावच्या वास्तूत जपून ठेवले आहेत. वास्तूच्या नूतनीकरणानंतर आईची कला एका दालनात मांडण्यात येईल.)
केकी मूस यांचा जन्म 1912 साली झाला. पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईतच झालं. त्यानंतर कलेच्या प्रांतात शिरावं अाणि त्यातच आयुष्यभर रमावं हे त्यांच्या मनात होतं. त्यांच्या धनाढ्य मामाला हा जगावेगळा ध्यास काही पसंत नव्हता. म्हणूनच जेव्हा मूस यांनी आपल्या मामाला कलावंत होण्याचा आपला मानस(खरं तर निर्धारच) सांगितला ते ऐकून मामा नाराज झाला.
"कलावंत व्हायची स्वप्नं असतील तर मुंबई सोडून चाळीसगावला जा," असं मामाने सांगितलं. तिथे मूस यांच्या आईसाठी वास्तुशिल्पी मामाने उभारून दिलेलं घर होतंच. आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या केकी मूस यांनी 1939 साली या वास्तूत प्रवेश केला.
...पुढची तब्बल 50 वर्षं ते याच ठिकाणी कलासाधनेत मग्न होते. ही वास्तू हेच त्यांचं जग होतं. चाळीसगाव स्टेशन हे अक्षरशः मूस यांच्या घराच्या बाहेर आहे, अगदी अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर. पण दोन अपवादात्मक प्रसंग सोडल्यास त्यांनी कधीही या घराचा उंबरा ओलांडला नाही. पहिल्यांदा बाहेर पडले ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादला जायला. तेही सकाळी जाऊन संध्याकाळी परत आपल्या मठीत आले. त्यानंतर एकदा विनोबा भावे चाळीसगाव स्टेशनच्या विश्रांतीगृहात काही काळ थांबणार होते. त्यांचे बंधू शिवाजी भावे हे केकी मूस यांचे मित्र असव्याने त्यांनी आग्रह केला म्हणूनच केवळ केकी मूस यांनी दुस-यांदा घराचा उंबरा ओलांडला. बाकी कोणाहीसाठी त्यांनी कधी घरातून बाहेर पाऊल टाकलं नाही. पंडित नेहरू, बाबा आमटे, प्र.के.अत्रे, ना.सी.फडके यांच्यासह अनेक दिग्गजांनी मूस यांची याच मठीत भेट घेतली आहे.
संग्रहालयाची पोटच्या पोरागत देखभाल करणारे गायकवाड काका आम्हांला भेटले म्हणूनच मूस यांचं आयुष्य आणि त्यांच्या कलाकृतीत दडलेला अर्थ आमच्यापर्यंत पोचला. त्यांना केकी मूस यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. गायकवाड काकांचे वडील आणि केकी मूस हे मित्र होते. मूस यांच्या घरावरून गायकवाड यांच्या शेतावर जाण्याचा रस्ता होता. त्यांच्या शेतात पिकणारा भाजीपाला आणि दूधदुभतं केकी मूस यांच्या घरी येत असे. त्यातून त्यांच्या वडिलांशी दोस्ती जमली. आयुष्यभर इंग्रजीचे शिक्षक राहिलेल्या गायकवाड काकांना मूस यांच्याकडून शेक्सपिअरन साहित्य समजून घेण्याचं भाग्य लाभलं. आजही त्यांच्या बोलण्यात त्याविषयीचा कृतज्ञ
भाव जाणवतो.
केकी मूस यांची चित्रं, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रणकला...टेबलटॉप फोटोग्राफी या कलाप्रकारात त्यांनी मिळवलेली मास्टरी, त्यांची ओरीगामी, शिल्पकलेचे नमुने...या सगळ्यातून मूस यांना मांडायचा असलेला विचार, त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन गायकवाड काकांमुळे आमच्यापर्यंत पोचला.
ज्या दालनात ही प्रदर्शनी मांडली आहे, त्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या-उजव्या बाजूला प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेली गंगा- यमुना यांची शिल्पं आहेत. आणि त्या दालनात मांडलेल्या कलाकृती म्हणजे सरस्वती आहे..अशी मूस यांची धारणा होती.
त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध येत असे तो नियतकालिकांमधून...किमान पन्नासेक वर्तमानपत्रं, मासिकं आणि पुस्तकं यांनी वेढलेल्या पलंगावर बसून केकी मूस यांची साधना चाले.
त्यांच्या तरुणपणातली प्रेमकहाणीही सांगितली जाते. शिकण्यासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांची प्रेयसी चाळीसगावला येऊन भेटून गेली होती. आणि काही काळातच परत येईन असं तिने वचन दिलं होतं. मात्र ती कधीच आली नाही. केकी मूसनी मात्र तिची आयुष्यभर प्रतीक्षा केली. कलकत्ता मेल मध्यरात्री 1च्या सुमारास चाळीसगाववरून पुढे जाते. ती जाईपर्यंत रोज ते जागे असत. त्यानंतर त्यांच्या घरातला दिवा मालवला जात असे.
या वास्तूशी त्यांचं अनामिक दृढ नातं होतं म्हणून की आपण हे जग सोडून गेल्यावर आपली प्रेयसी आली तर तिची निराशा होऊ नये म्हणून की दोन्ही कारणांसाठी...(खरं कारण गुलदस्त्यातच राहिलं) मृत्यूनंतरही इथेच दफन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेचा त्यांच्या स्नेहीजनांनी मान राखला. आणि तिथे अंगणातच त्यांचं दफन केलं.
केकी मूस यांचं वास्तव्य आजही तिथेच आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
कलेची जी वाट त्यांनी निवडली त्या वाटेवर काही दीपस्तंभ उभे केले आणि प्रेमाच्या दुनियेत अखेरच्या श्वासापर्यंत प्रेयसीची वाट पाहणारा एकनिष्ठ प्रियकर कसा असतो, त्याचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं.
ऋषितुल्य प्रकृतीचा प्रेमी भेटल्याचा आनंद आजच्या दिवसाने दिला.
- अश्विनी मयेकर