कोल्च

विवेक मराठी    26-Oct-2016
Total Views |

दुखऱ्या कमरेने खाली वाकून दुर्गाबाय त्या सगळया जिनसा उचलताना वरच तिला नेमका तो फूलपाखरांचा कोल्च सापडला आणि तिला एकदम चैत्राली आठवली. तिच्या सगळयात धाकटया पुतण्याची मुलगी. आता अमेरिकेत राहाणारी. वीस वर्षांपूर्वी कधीतरी एकदा उन्हाळयाच्या सुट्टीत इथे राहायला आली होती. आठ-दहा वर्षांची चुणचुणीत पोरगी. जेमतेम महिनाभर इथे होती, पण तेवढया दिवसांत भिंगरीसारखं नाचून तिने आख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. दुर्गाबायच्या हातचा जुना कोल्च पांघरायला घेताना तिला इतका आवडला होता की, 'मलापण असाच एखादा कोल्च बनवून देना दुर्गाज्जी' अशी तिने सारखी दुर्गाबायच्या मागे भुणभुण लावली होती.

 
संध्याकाळचे पाच वाजले. परसातल्या तांबडया माडाच्या झावळयांच्या सावल्या भुताच्या बोटांसारख्या लांबच लांब होऊन राजांगणातल्या तुळशी वृंदावनाला कवेत घ्यायला लागल्या. उसवलेल्या पोलक्याला आखडलेल्या बोटांनी टाके घालत चौकीवरच्या ढेरपोटया सिमेंटच्या खांबाला रेलून बसलेली दुर्गाबाय गुडघ्यांवर हाताने दाब देत हळूहळू उठली आणि तिने विजेचं बटन दाबलं. गेल्या पावसात भिंतीत ओल साठून सगळं घरच विजेचे धक्के द्यायला लागलं होतं, तेव्हा शंभर मिनत्या केल्यानंतर शेजारच्या कृष्णाने हा नवीन बल्ब दुर्गाबायला जोडून दिला होता. नुसतं एक पांढरं बटन, काळया-पांढऱ्या पिळाची एक लांब वायर आणि तिच्या टोकाला लोंबणारा एक उघडा-वाघडा चाळीसचा बल्ब. वायर भिंतीवरच्या खिळयाला नुसतीच अडकवलेली. शेड-बीड काहीच नाही. त्या दिव्याचा आंबट, पिवळा, क्षीण उजेड ओल आलेल्या भिंतीवरचे पोपडेन्पोपडे उघडे पाडायचा. कधीकाळी दहा-बारा वर्षांपूर्वी एका गणेश चतुर्थीला रंगवलेली ती भिंत आता भाजलेल्या पापडासारखी फोडा-फोडांनी भरून गेली होती.

राजांगणातून वाऱ्याचा हलका जरी झोत आला, तरी तो चौकीवरचा एकमेव बल्ब हेलकावे खाई आणि चौकीवरच्या सावल्या विचित्र हिंदकळत. सावल्यांचा तो विकट नाच बघितला की दुर्गाबायचे म्हातारे काळीज दडपून जाई. आजकाल तिला अंधाराची भारी भीती वाटे. दांडीवर वाळत घातलेली जाड गोधडी एखाद्या मांजरीच्या पाठीवर अकस्मात पडली, तर त्या जाड, घट्ट, अंधाऱ्या पांघरुणाखाली ती कशी सैरभैर होऊन पळेल.. तसे काहीसे दुर्गाबायला वाटे. पावसाळयाच्या दिवसांत तर रात्री वीज जाऊ नये म्हणून दुर्गाबाय सतत प्रार्थना करीत असे आणि कधीकाळी तिला एका पुतण्याने भेट म्हणून अमेरिकेहून आणलेली छोटी विजेरी ती दोरी अडकवून आजकाल सदैव सौभाग्यालंकारासारखी अंगावर बाळगीत असे. वर्षामागे म्हादेवाप्पा गेले, तेव्हापासून त्या एवढया मोठया जुन्या पध्दतीच्या चौसोपी घरात दुर्गाबाय आता एकटीच राहायची.

म्हादेवाप्पा होते, तेव्हा निदान त्यांची सगळी उस्तवार करण्यात दुर्गाबायचा वेळ जायचा. गेली चार-पाच वर्षं अंथरुणाला खिळूनच होते म्हादेवाप्पा. त्यांची औषधं वेळोवेळी देणं, त्यांचं पथ्यपाणी बघणं, त्यांचं अंथरूण-पांघरूण साफ ठेवणं ह्या सगळयात दिवस कसा निघून जायचा, दुर्गाबायला कळायचंच नाही. दहा वेळा माजघरातून म्हादेवाप्पा झोपले आहेत त्या खोलीत धावाधाव करता-करता कंबर दुखायची, पोटऱ्या वळायच्या आणि मग ते ठसठसणारं शरीर घेऊन दुर्गाबाय स्वत:शीच पुटपुटत रात्री उशिरापर्यंत जागायची. पण म्हादेवाप्पा गेले आणि दुर्गाबायच्या आयुष्याचं प्रयोजनच आपल्याबरोबर घेऊन गेले. आता आख्खा दिवस दुर्गाबायपुढे एका फाटक्या नऊवारी लुगडयासारखा पडलेला असायचा आणि मोठया कष्टाने ती त्याला जाणाऱ्या तासा-तासाचं ठिगळ जोडत बसायची. शेजारचा कृष्णा दुपारी घरी जेवायला येताना दुर्गाबायसाठी पेपर आणून टाकत असे. तो पेपर मग ती दिवसभर पुरवून पुरवून वाची, अगदी जाहिरातींसकट. तेवढाच वेळ जायचा तिचा. बारीक टायपातल्या बातम्या वाचताना डोळे दुखायचे, सतत डोळयातून पाणी वाहायचं, तरीही दुर्गाबाय पेपर वाचायची.

आता दुर्गाबायने शिवणाचं सामान तसंच गुंडाळून चौकीवरच्या टेबलावर ठेवलं आणि दुखऱ्या गुडघ्याने लंगडत लंगडत हळूहळू ती स्वयंपाकघराकडे निघाली. जुन्या घरातलं ते गुहेसारखं अंधारं, भलंमोठं स्वयंपाकघर. दोन टोकांना दोन अशा लाकडी गजांच्या चौकोनी खिडक्या. त्यातूनच काय तो उजेड यायचा. प्रकाश यायला म्हणून कौलांमध्ये बसवलेल्या तीन-चार काचा आता इतक्या धुरकटलेल्या होत्या की त्यातून फक्त क्षीण, मळक्या प्रकाशाचे झोतच काय ते यायचे. तेही ऐन दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना. स्वयंपाकघरातली टयूब अजून शाबूत होती, पण पेटताना खूप वेळा चालू-बंद होऊन पेटायची. ती टयूब एकदा पेटली की दुर्गाबायला जरा हायसं वाटायचं. तो पांढराभक्क प्रकाश तेवढया वेळापुरती तरी अंधाराची बुरशी साफ करून जायचा.

थरथरत्या हातांनी दुर्गाबायने गॅस पेटवला आणि सकाळची भात-भाजी गरम करायला ठेवली. एका माणसासाठी आणखी काय शिजवायचं असतं? गोळाभर भात, सकाळी भाजीवाली घरी आणून द्यायची ती कसलीतरी भाजी आणि जेमतेम अर्ध्या वाटीची डाळ शिजवली, तरी ती दुर्गाबायला चार-पाच दिवस पुरायची. गणपतीला झाडून सगळे पुतणे घरी यायचे. तीन दिवसांपुरती का होईना, पण गणपतीबरोबरच घराचीही प्राणप्रतिष्ठा व्हायची. सुना-नातवंडांच्या आवाजाने घर गजबजून जायचं. तेव्हा गरज लागते, म्हणून स्वयंपाकघरात गॅस, फ्रीज, मिक्सरसकट सगळया सोयी करून ठेवल्या होत्या. एक चवथ सोडली, तर ते शंभर वर्षांचं जुनं घर आता गाढ झोपेत असल्यासारखंच दिसायचं. फक्त गणपतीच्या तीन दिवसांत घर जागं व्हायचं. माडीवरच्या खोल्या उघडल्या जायच्या. काकणांच्या, नारळ खवायच्या, फोडणीच्या चरचरीत आवाजाने स्वयंपाकघर भरून जायचं, नातवंडांचे उंच, हसरे आवाज घरभर घुमायचे. जीर्ण चौकीवर आरत्या दुमदुमायच्या, राजकारणावर गरमा गरम चर्चा रंगायच्या. पण चवथ उरकली की परत एकदा खोल्यांना कुलपं लावून सगळे आपापल्या घरी पांगायचे. पुन्हा त्या घरात दुर्गाबायचं एकाकी, ओसाड राज्य सुरू व्हायचं. मग घरात चाहूल असायची ती फक्त दुर्गाबायची आणि कौलांवरून वेळी-अवेळी उडया मारत जाणाऱ्या माकडांची! सगळा गाव त्या माकडांच्या उच्छादामुळे त्रासला होता, पण दुर्गाबायला मात्र छतावर माकडे नाचू लागली की हायसं वाटायचं. ''नशीब, माकडांची तरी जाग आहे...'' एक उसासा टाकून दुर्गाबाय स्वत:शीच म्हणायची.

भात-भाजी गरम करता करता दुर्गाबायने डोळे फाडून बाजूच्या खिडकीतून बाहेर बघायचा प्रयत्न केला. अंधार आता सायीसारखा हळूहळू घट्ट जमून येत होता. त्या अर्धवट उजेडात मागच्या परसातल्या औदुंबराच्या झाडाचं वठलेलं, निष्पर्ण, सरळसोट खोड एखाद्या धारदार तलवारीसारखं आभाळ चिरीत होतं. आपसूकच उगवलेलं ते औदुंबराचं रोप दुर्गाबायनेच पाणी घालून जगवलं होतं. पुढे ते झाड इतकं मोठं झालं की आजूबाजूच्या तीन विहिरींमध्ये त्याची जाळीदार मुळं दिसायला लागली होती. जेव्हा ते झाड घराच्या छपरावर रेलायला लागलं, तेव्हा दुर्गाबायचा मोठा दीर ते कापायला निघाला होता. पण दुर्गाबायच्या ठाम विरोधामुळे तो औदुंबर वाचला होता. ''औदुंबर मारला तर घर नांदतं राहत नाही..'' दुर्गाबायने तेव्हा म्हटलं होतं. तेव्हा ते झाड तसंच राहिलं होतं खरं, पण घर मात्र नांदतं राहिलं नव्हतं.

आता तर ते झाड साफच वठून गेलं होतं. पूर्वी त्या खिडकीतून हिरव्या पानांच्या दाटीशिवाय कधी काही दिसायचं नाही. पण आता मात्र पलीकडल्या देसायांच्या माजघराची खिडकी साफ दिसायला लागली होती. दोन्ही घरच्या बागा निगराणीविना पार सुकून गेल्या होत्या. पण देसायांच्या माजघरात आज दिवा दिसत होता, 'म्हणजे देसाई वहिनी आलेल्या असाव्यात घरी,' दुर्गाबायने मनाशीच म्हटलं. देसाईसर गेल्यापासून वहिनी बहुतेक वेळ इंदूरला त्यांच्या मुलाकडेच असायच्या, किंवा अमेरिकेला लेकीकडे जायच्या. अधूनमधून कधीतरी आठ-पंधरा दिवसांसाठी गावात येऊन जायच्या. म्हणजे तेही घर आता बंदच असायचं. त्याच्या डाव्या बाजूचं दत्ताकाकाचं घर तर आता अर्धंअधिक कोसळूनच पडलं होतं. पलीकडल्या कामतांच्या वाडयाची तीच तऱ्हा. गावातली सगळी तरुण मंडळी शिक्षणासाठी, व्यवसायासाठी पांगलेली. जे गावात आहेत, त्यांनी भावकीला कंटाळून आपली आपली स्वतंत्र नवी घरं बांधलेली. जुनी वडिलोपार्जित घरं दुरुस्त करायला लागणारा पैसा कुणीच हात उचलून द्यायचं नाही. त्यामुळे गावातली सगळी जुनी चौसोपी घरं मेलेल्या ढोरांसारखी अस्ताव्यस्त पसरलेली होती. काळाने त्या घरांवर गिधाडासारख्या मारलेल्या चोचा स्पष्ट कळून यायच्या.

एक सुस्कारा सोडून दुर्गाबायने कसेबसे चार घास पाण्याबरोबर पोटात ढकलले. आजकाल नाहीतरी तोंडाला चव राहिली नव्हतीच. दुर्गाबायला मासे खायची इतकी आवड; पण मासे साफ करायला, खवले काढायला त्रास होतो, म्हणून दुर्गाबायने आजकाल मासे खाणंच सोडून दिलं होतं. नेहमीची ओळखीची भाजीवाली जी भाजी घरी आणून द्यायची, तीच कसलीतरी पालेभाजी जेमतेम फोडणीला टाकून कशीबशी दुर्गाबाय बनवायची. आदल्या दिवशी बनवलेलं ते शिळं, बेचव जेवण घशाखाली ढकलताना आज अकस्मात दुर्गाबायची जीभ चाळवली. कोवळया, ताज्या, लुसलुशीत तार्ल्यांचं खूप ओलं खोबरं घालून केलेलं हळदीच्या वासाने आणि तिरफळांच्या फोडणीने घमघमणारं पिवळंधमक सुक्कं, लालभडक उकडया तांदळाची गरमा गरम पेज आणि तोंडी लावायला शंकर छाप हिंगाचा वास असलेला अस्सल तारवोटी मिरचीचा तिखटजाळ, दाट, फोड-फोड आलेला, टम्म फुगलेला पापड खायची तिला अनिवार इच्छा झाली आणि हातातला घास तसाच राहिला. तोंडात जमलेली लाळ घशाखाली ढकलत दुर्गाबायने तसेच हात धुतले. जेवण झाकून परत फ्रीजमध्ये ठेवलं. ताटातलं उरलेलं अन्न मागचं दार उघडून तिथल्या दगडावर टाकलं. पक्षी नाहीतर कुत्री येऊन ते अन्न खातील ह्याची तिला खात्री होती. ताट-वाटी आणि दोन भांडी होती, ती घासून दुर्गाबायने उपडी ठेवली आणि मागचं आवरून, लाईट बंद करून ती सावकाश पावलं टाकीत झोपायच्या खोलीत गेली. त्या एवढया मोठया घरात आता फक्त चौकी, माजघर आणि दुर्गाबायची खोली इतक्यातच माणसाचा वावर दिसे. बाकी घर सुस्तावलेल्या अजगरासारखं गुंगीत पडून असे.

दुर्गाबायने खोलीतला दिवा लावला आणि थरथरत्या हाताने फडताळातल्या जीर्ण, पिवळट झालेल्या पोथ्या काढल्या. आजकाल तिच्या धुरकटलेल्या डोळयांना फक्त मोठाली अक्षरंच दिसत. वरचं महालसास्तोत्र काढून दुर्गाबायने कापऱ्या, मऊ स्वरात स्तोत्र वाचायला सुरुवात केली. तेवढयात खाटेच्या उशाशी ठेवलेल्या ट्रंकांच्या उतरंडीमागे तिला कसली तरी हालचाल जाणवली. घूस असावी ह्या विचाराने दुर्गाबायने उठून वरच्या ट्रंकेवर जोरात हात मारला, तर ती ट्रंकच धाडदिशी खाली पडली आणि आतल्या सगळया जिनसा जमिनीवर सांडल्या. दुर्गाबायची दोन रेशमी लुगडी, म्हादेवाप्पाचे नीट घडी करून ठेवलेले जुने कोट आणि दुर्गाबायने हाताने शिवलेल्या चारपाच गोधडया व रंगीबेरंगी तुकडे जोडून केलेले कोल्च!

दुखऱ्या कमरेने खाली वाकून दुर्गाबाय त्या सगळया जिनसा उचलताना वरच तिला नेमका तो फूलपाखरांचा कोल्च सापडला आणि तिला एकदम चैत्राली आठवली. तिच्या सगळयात धाकटया पुतण्याची मुलगी. आता अमेरिकेत राहाणारी. वीस वर्षांपूर्वी कधीतरी एकदा उन्हाळयाच्या सुट्टीत इथे राहायला आली होती. आठ-दहा वर्षांची चुणचुणीत पोरगी. जेमतेम महिनाभर इथे होती, पण तेवढया दिवसांत भिंगरीसारखं नाचून तिने आख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. दुर्गाबायच्या हातचा जुना कोल्च पांघरायला घेताना तिला इतका आवडला होता की, 'मलापण असाच एखादा कोल्च बनवून देना दुर्गाज्जी' अशी तिने सारखी दुर्गाबायच्या मागे भुणभुण लावली होती.


तिनेच आईच्या मागे लागून बाजारात जाऊन वेगवेगळया रंगांचे तुकडे आणून दुर्गाबायच्या हवाली केले होते, फूलपाखराचं डिझाईनपण तिनेच निवडलं होतं आणि दुर्गाबायच्या मागे लागून तिने तो कोल्च मांडायला लावला होता. ती सुट्टीत गावी असेपर्यंत तो कोल्च पूर्ण करण्याचा दुर्गाबायने शर्थीचा प्रयत्न केला होता. पण दिवसाला चार-पाच तास शिवूनदेखील चैत्राली परत मुंबईला जाईपर्यंत तो कोल्च पूर्ण झाला नव्हता. शेवटी गाल फुगवलेल्या, हिरमुसलेल्या चैत्रालीला दुर्गाबायने वचन दिलं होतं की येत्या चवथीपर्यंत ती तो कोल्च शिवून पूर्ण करेल आणि त्याप्रमाणे दुर्गाबायने तो पूर्ण केलाही होता. पण त्या पुढच्या चवथीला चैत्राली आलीच नाही. तिच्या बाबांना अमेरिकेत नोकरी मिळाली होती आणि ते सगळे आता तिथेच स्थायिक झाले होते. आता तर चैत्रालीचं लग्न होऊन तिलादेखील नुकतीच मुलगी झाली होती. तो फूलपाखरांचा कोल्च मात्र दुर्गाबायने जो घडी करून आत ट्रंकेत ठेवला होता, तो इतकी वर्षं तसाच होता!

त्या कोल्चाचा जड, उबदार भार हातांवर जाणवताच चैत्रालीच्या आठवणी इतक्या वर्षांनंतर दुर्गाबायला स्पर्श करून गेल्या. एकाएकी तिच्या मनात विचार आला. हा कोल्च आता चैत्रालीच्या मुलीला पाठवता आला तर? नुसत्या त्या विचारानेच तिच्या शिणलेल्या मनात उत्साह संचारला. आता पुढच्या चवथीला चैत्रालीचा काका रामकृष्ण येईल, तेव्हा त्याला सांगावं असा विचार करून दुर्गाबायने हलक्या हाताने त्या नव्या-कोऱ्या कोल्चाची घडी उलगडली, आणि ती मटकन एकदम पलंगावर बसली. इतकी वर्षं त्या दमट, कुंद पेटीत बंद करून ठेवल्यामुळे न वापरताच तो कोल्च पार झिरझिरून गेला होता. मागे अस्तर म्हणून लावलेलं म्हादेवाप्पांचं धोतर कसर लागून पार विरून गेलं होतं आणि वरची सुंदर फूलपाखरं बुरशी लागून विद्रूप झाली होती. एक प्रकारचा, ओला, कोंदट वास त्या कोल्चाला पार विळखा घालून बसला होता. दुर्गाबायच्या म्हाताऱ्या, अधू डोळयात टचकन पाणीच उभं राहिलं. तिला वाटलं की ह्या गावाची, ह्या घराची आणि आपली हालत ह्या कोल्चासारखीच आहे. न वापरल्यामुळे आपण असेच जीर्ण होऊन विरून गेलेलो आहोत! त्या विचाराने थिजून जाऊन दुर्गाबाय तशीच बिछान्यावर थंड गोळा होऊन बसून राहिली.

shefv@hotmail.com