आगरी महोत्सव - गावाचा उत्सव

विवेक मराठी    05-Dec-2015
Total Views |


आगरी यूथ फोरमचा एक अतिशय यशस्वी, प्रसिध्द उपक्रम म्हणजे 'आगरी महोत्सव'. हा महोत्सव अतिशय यशस्वीपणे एका तपाची पूर्ती करून आता पुढे पावलं टाकत आहे. महोत्सव आयोजित करणारे आगरी समाजातले असले, तरी हा डोंबिवली शहराचा उत्सव बनला आहे. या शहराची एक विशेष ओळख बनला आहे. यामागे आगरी यूथ फोरमने दर वर्षी महोत्सवाचं केलेलं नेटकं आणि विचारपूर्वक नियोजन, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी संपूर्ण टीमने घेतलेले अफाट कष्ट कारणीभूत आहेत.

 डोंबिवली आणि परिसरातल्या गावांमध्ये आगरी समाजाचं पिढयानपिढया वास्तव्य आहे. अन्यत्रही त्यांची वस्ती आहे, पण इथली संख्या लक्षणीय म्हणावी इतकी! 90च्या आसपास औद्योगिकीकरणाचं वारं वाहू लागलं, त्या वेळी या परिसरातल्या जमिनीला सोन्याचे भाव आले. आगरी समाजातल्या ज्या कुटुंबांकडे जमिनी होत्या, त्यातले बहुतेक जण नवश्रीमंतांमध्ये गणले जाऊ लागले. समाजात आर्थिक बरकत आली, पण बाकी प्रगती विशेष नव्हती. उच्च शिक्षण घेणारे मोजकेच होते. मात्र ज्यांच्यात उच्च शिक्षणामुळे विधायक बदल झाला होता, त्यांना हे बदल आपल्या समाजातही व्हायला हवेत असं तीव्रतेने वाटू लागलं. ठरावीक व्यवसायामुळे आणि स्वभाववैशिष्टयांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या आगरी समाजाची यापेक्षा काही वेगळी ओळख निर्माण व्हावी, असं या नवशिक्षित तरुणांना वाटू लागलं. त्यातूनच या तरुण, शिक्षित मंडळींनी एकत्र येऊन आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी काही भरीव काम करण्याच्या उद्देशाने 1991 साली 'आगरी यूथ फोरम'ची स्थापना केली. आणि या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली.

या आगरी यूथ फोरमचा एक अतिशय यशस्वी, प्रसिध्द उपक्रम म्हणजे 'आगरी महोत्सव'. हा महोत्सव अतिशय यशस्वीपणे एका तपाची पूर्ती करून आता पुढे पावलं टाकत आहे. महोत्सव आयोजित करणारे आगरी समाजातले असले, तरी हा डोंबिवली शहराचा उत्सव बनला आहे. या शहराची एक विशेष ओळख बनला आहे.

यामागे आगरी यूथ फोरमने दर वर्षी महोत्सवाचं केलेलं नेटकं आणि विचारपूर्वक नियोजन, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी संपूर्ण टीमने घेतलेले अफाट कष्ट कारणीभूत आहेत. या महोत्सवाला वर्षानुवर्षं हजेरी लावणारे तर अनेक जण आहेत. मुंबईच्या उपनगरांतून किंवा त्याहूनही लांबून - म्हणजे अलिबाग, शहापूर, वसई, नाशिक, भिवंडी या ठिकाणाहून येणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. गेल्या वर्षी नागपूर विद्यापीठात पीएच.डी.चा अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी तिच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून आगरी महोत्सवात आली होती.

महोत्सवामागची आयोजकांची भूमिका आणि यशस्वितेमागचं रहस्य समजून घेण्यासाठी, या महोत्सवाच्या आयोजकांमधले मुख्य सूत्रधार, आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांची भेट घेतली...त्या गप्पांची ही संक्षिप्त नोंद...

असा आगळावेगळा महोत्सव सुरू करण्यामागे काय विचार केला होता?

आमच्या समाजातल्या बहुतेकांच्या जमिनी कंपन्यांसाठी, मोठमोठया गृहनिर्माण प्रकल्पांसाठी, हॉटेल व्यवसायासाठी विकल्या जाऊ लागल्या आणि हातात भरपूर पैसा खेळू लागला. शिक्षण कमी आणि पैसा भरपूर असं झालं की आयुष्याची गाडी रुळावरून घसरण्याची शक्यताच अधिक. हा धोका आम्हांला जाणवत होता. त्यातूनच समाजासाठी प्रबोधनात्मक काम करण्याच्या हेतूने आम्ही आगरी यूथ फोरमची स्थापना केली. 

काही वर्षांनी असं वाटलं की, हे उपक्रम चालू असतानाच समाजातल्या नवशिक्षित तरुण पिढीला आवडेल असाही एखादा उपक्रम हाती घ्यावा... ज्यातून विचार प्रबोधनही घडेल, दर्जेदार मनोरंजनही होईल आणि आमच्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी इतरांसमोर मांडण्याची संधीही मिळेल. या विचारातून आगरी महोत्सव ही कल्पना पुढे आली. ती लोकांनी किती उचलून धरली हे तर तुम्ही पाहता आहातच. यामुळे आम्ही एकमेकांच्या जवळ तर आलोच, तसंच समाजातील अन्य घटकांशीही आगरी समाज स्नेहाच्या धाग्याने जोडला गेला. 

पहिली पाच वर्षं सात दिवसांचा महोत्सव होता. पण लोकांचा आग्रह इतका वाढू लागला की सहाव्या वर्षापासून आगरी महोत्सव आठ दिवसांचा झाला. याहून जास्त दिवस असावा अशी लोकांची इच्छा असली, तरी वेगवेगळया व्यवस्थांवर ताण येतो, खूप लांबलांबून माणसं यात सहभागी झालेली असतात. तीही त्यांच्या घरी सुखरूप पोहोचावीत अशी आमची इच्छा असते. त्यामुळे मागणी असूनही आठ दिवसांची मर्यादा ओलांडायची नाही, असं आम्ही ठरवलं.

हौशी कलाकारांसाठी संस्कृती दर्शन हा कार्यक्रम, मान्यवरांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शाकाहारी/ मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, वस्तूंचे स्टॉल्स आणि जत्रेत असतात तसे लहान मुलांसाठी खेळ... आकर्षणाचे इतके आयाम या महोत्सवाला आहेत. कशी आखणी करता? यासाठी मनुष्यबळही खूप लागत असेल, आजच्या धावपळीच्या जगात ते कसं मिळवता?

महोत्सवाच्या पहिल्या 7 दिवसात रोज कमीत कमी 50 ते 60 हजार लोक येऊन जातात. त्यात रविवार किंवा सुट्टीचा दिवस असला, तर त्याहून जास्त आणि शेवटच्या दिवशी तर लाखभर लोक येऊन जातात. एवढया मोठया संख्येसाठी महोत्सवाचं आयोजन करणं हे थोडया लोकांचं काम नाहीच. यूथ फोरमचे सदस्य तर आपला वेळ देतातच, पण त्यापलीकडचे अनेक जण घरचं कार्य असावं इतक्या आपलेपणाने महोत्सव यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतात.

महोत्सवाची तयारी सुरू होते जून महिन्यात. आम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात महोत्सव करतो. त्यामुळे पहिलं काम म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून सावळाराम क्रीडा संकुलातली जागा मिळण्यासाठी अर्ज करणं. स्टॉल उभारणी आणि बाकीच्या तयारीसाठी महोत्सवाआधी 7/8 दिवस तरी संकुल ताब्यात मिळावं लागतं. एकदा हा अर्ज पाठवला की पुढच्या विचाराला सुरुवात होते.

ज्येष्ठ माणसांपासून ते आमची उत्साही तरुण पिढी आणि महिला वर्गही आयोजनात सहभागी होतो. आयोजनात सुमारे 100 लोक महत्त्वाचं काम करतात आणि त्यांना सहकार्य करणारे तसंच उत्साहाने महोत्सवात सहभागी होणारे अनेक असतात. महोत्सव यशस्वी होण्यासाठी साधारण 15 समित्या काम करत असतात. महोत्सवासाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या परवानग्या मिळवणारी समिती, सांस्कृतिक कार्यक्रमांची निवड करणारी समिती, संस्कृती दर्शनमध्ये कोणत्या प्रकारचे कार्यक्रम सादर व्हावेत याचा निर्णय करणारी समिती, वस्तू विक्रीच्या स्टॉलचं बुकिंग करणारी समिती, खाद्यपदार्थांच्या स्टॉलचं बुकिंग करणारी समिती अशा विविध समित्या कार्यरत असतात. महोत्सवात स्टॉलना खूप मागणी असते. स्टॉलसाठी बुकिंग जवळजवळ 2-3 महिने आधीच होऊन जातं. यंदाही खाद्यपदार्थांचे 15-20 स्टॉल तरी वेटिंग लिस्टमध्ये आहेत.

संस्कृती दर्शनमध्ये कार्यक्रम सादर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला एक फॉर्म भरून द्यावा लागतो. खूप तपशीलवार माहिती त्यात लिहावी लागते. कार्यक्रम काय सादर करणार, गाण्यावर नृत्य करणार असतील तर ते गाणं कोणतं याची विचारणा होते. तसंच आधी आमच्या समितीपुढे एक झलक सादर होते. समजा, खूप लांब राहणारी मुलं सहभागी होणार असतील, तर आमचे सदस्य त्या ठिकाणी जाऊन परीक्षण करतात. हे परीक्षण मुख्य म्हणजे कार्यक्रमाचा दर्जा आणि ऑडिओ तपासण्यासाठी होतं. याचं कारण, महोत्सवातले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम तिसाई केबल नेटवर्कच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचत असतात.

मान्यवरांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठरवताना सामाजिक विषयावरच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांनाही आवर्जून स्थान देतो. यंदा अवयवदानाच्या चळवळीची माहिती देणारा एक कार्यक्रम होणार आहे, तसंच अनुराधा प्रभुदेसाई यांचा कारगिलमधील सैनिकी जीवनावर प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम होणार आहे.

आमची आजची तरुण पिढी अतिशय उत्साहाने यात सहभागी होते. आता बहुतेक मुलं उच्चशिक्षित आहेत, तरी त्यांचे व्याप सांभाळून यात सहभागी होतात. त्यांचे विचार मांडतात. आम्हीही त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकतो.

आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, स्त्रियांचा कामातला लक्षणीय सहभाग. या 8 दिवसांत तिकीटविक्रीचं व्यवस्थापन त्या सांभाळतात. साधारण 4पासून रात्री 11पर्यंत हे काम असतं. पण जराही गडबड, गोंधळ न होता त्या ही जबाबदारी आनंदाने पार पाडतात. त्याशिवाय ज्या मोठया स्त्री कलावंत किंवा अन्य क्षेत्रातल्या महिला येतात, त्यांच्या आदरातिथ्याची जबाबदारी आमच्या महिला वर्गावर असते.

 आमच्यापैकी कोणीही 'इव्हेंट मॅनेजमेंट'चं शिक्षण घेतलेलं नाही. पण या महोत्सवाबद्दल इतकी आत्मीयता आहे, त्यामुळे प्रत्येकाला काम करण्याची प्रेरणा मिळते. या आगरी महोत्सवानेच आम्हाला प्रशिक्षण दिलं, तयार केलं... अनुभवातून शिकत गेलो आम्ही सगळेच...

खास महिलांसाठी एक दिवस कार्यक्रमाची वेळ राखून ठेवलेली असते, त्याविषयी...

आमच्या समाजातल्या स्त्रिया आत्ता कुठे मोकळेपणी बाहेर पडू लागल्या आहेत. आतापर्यंत त्यांचं जग त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित होतं. त्यांच्याकडचे कलागुण स्टेजवर सादर करायची फारशी संधी मिळाली नव्हती. ती संधी आम्ही या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या गावोगावच्या माता-भगिनी या दिवशी कार्यक्रम सादर करतात. त्यासाठी तयारीही खूप उत्साहाने करतात.

कार्यक्रमांची निवडही खूप चोखंदळपणे करता, हे तुमच्या कार्यक्रम पत्रिकेवरून लक्षात येतं...

कार्यक्रम ठरवताना केवळ आमच्या आगरी समाजाचा विचार करत नाही. आगरी महोत्सवात समाजातल्या सर्व स्तरातले लोक येतात. मुस्लीम समाजातूनही येतात. तेव्हा येणाऱ्या सर्वांसाठी काय आवश्यक आहे याचा विचार करून, सद्यःस्थितीतले महत्त्वाचे विषय लक्षात घेऊन कार्यक्रमांची निवड करतो. चर्चा, परिसंवाद, व्याख्यान, मुलाखत असं वैविध्य असतं. यंदाच्या महोत्सवात पहिल्याच दिवशी 'आगरी समाज - काल, आज आणि उद्या' या विषयावर चर्चा आयोजित केली आहे. आमच्या समाजात चांगलं काय आहे, जे वाईट आहे त्यावर कशी मात करता येईल, नवीन पिढीच्या विचारांची दिशा काय आहे हे सगळं या चर्चेतून मांडलं जावं अशी अपेक्षा आहे.

या आठ दिवसात एक दिवस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि नाटयसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची मुलाखत, असाही एक कार्यक्रम असणार आहे.

आगरी समाजाच्या इतिहासाची माहितीपर प्रदर्शनी एका वर्षी मांडली होती. समाजाचा इतिहास, त्याची वसतिस्थानं, पेहराव, चालीरिती, वैशिष्टयपूर्ण खाद्यपदार्थ, जुन्या काळातल्या घरांची रचना... अविस्मरणीय अशी ती प्रदर्शनी होती. या वर्षी असं लक्षवेधी काय आहे?

या वर्षी वसई-जूचंद्र भागातल्या रांगोळी कलावंतांची कला महोत्सवात पाहायला मिळणार आहे. हे कलाकार खूप नावजलेले आहेत. स्त्रीभ्रूणहत्या, भ्रष्टाचार अशा सामाजिक विषयांवर ते रांगोळीच्या माध्यामातून ते जनजागृती करतील. या व्यतिरिक्त अन्य विषयांवरच्या रांगोळयाही असतील.

खाद्यपदार्थांचे स्टॉल हा येणाऱ्या मंडळींसाठी एक आकर्षणाचा विषय असतो. विविध वस्तूंच्या विक्रीचेही स्टॉल असतात..

पुस्तकांपासून ते गाडीपर्यंत असं स्टॉलमध्ये वैविध्य असतं. डोंबिवलीतील प्रसिध्द फ्रेंड्स लायब्ररीचे पै, सुमारे एक लाख पुस्तकं पुस्तकप्रेमींसाठी उपलब्ध करून देतात. दर वर्षी त्या स्टॉलवर चांगली गर्दी होते आणि विक्रीही...

या निमित्ताने अनेक मोठमोठे कलाकार डोंबिवलीत येतात आणि हौशी कलाकारांना चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं...

हो तर... या महोत्सवामधून वेगवेगळया क्षेत्रातले सुमारे 1400-1500 कलावंत आपली कला रसिकांसमोर सादर करतात. हेसुध्दा या महोत्सवाचं वैशिष्टय आहे.

वेगवेगळया शाळांमधल्या दीड ते दोन लाख मुलांना आम्ही एकदा भेट देण्यासाठी दर वर्षी फ्री पासेस देतो. एवढी मुलं आईवडिलांबरोबर भेट देतात आणि एकदा आली की दर वर्षी येतात.

एका विशिष्ट समाजाचा एवढा मोठा उत्सव हीसुध्दा एक वैशिष्टयपूर्ण घटना आहे. असा दुसरा उत्सव, तोही सातत्याने होत असेल असं ऐकिवात तरी नाही...

दुसरं कोणी करत असेल, तर त्याची आम्हालाही माहिती नाही. सुरुवातीला काहींनी 'आगरी महोत्सव' हे नाव का देता, असं विचारलं. पण आम्हाला त्यात वावगं काही वाटलं नाही. तेच नाव ठेवायचं नक्की केलं.

पूजनीय नानासाहेब धर्माधिकारींनी उपस्थित राहून आमच्या कामाला आशीर्वाद दिले, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ते अशा सार्वजनिक कार्यक्रमात जात नसत, पण आगरी महोत्सवात एकदा नाही तर दोन वेळा आले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भेट दिली. अशी अनेक नावं सांगता येतील.

आमच्या महोत्सवावर कुठल्याही विशिष्ट राजकीय पक्षाचं लेबल नाही. सर्वांचं या महोत्सवात स्वागत होतं. राज्यातले विविध राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते इथे आले, तसे राज्याचे मुख्यमंत्रीही येऊन गेले. इथे सगळे मतभेद विरून जातात असा आमचा अनुभव आहे. कोणालाही विशेष महत्त्व किंवा कोणालाही दुय्यम लेखलं जात नाही.

 या महोत्सवातून मिळणारा निधीही खूप चांगल्या कामासाठी वापरला जातो असं ऐकलं...

आम्हाला जो काही फायदा होतो, त्यापैकी मोठा हिस्सा कोपरगाव इथे सुरू केलेल्या ज्युनिअर कॉलेजसाठी उपयोगात येतो. तसंच वर्षभर आम्ही आगरी यूथ फोरमच्या माध्यमातून जे सामाजिक काम करतो, त्यासाठीही काही रक्कम खर्च होते.

यंदा आगरी यूथ फोरमने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे. नव्या जगात जगण्यासाठी आमच्या समाजाला नवी वैचारिक दिशा देण्याचं काम आम्ही महोत्सवाच्या माध्यमातून करतो आहोत. आज इतक्या वर्षांनी मागे वळून बघताना आम्ही योग्य मार्गावर आहोत, हे समाधान मनात आहे. समाजाचा सकारात्मक प्रतिसाद आणि आबासाहेब पटवारी, शं.ना.नवरे, बाजपेयी सर अशा डोंबिवलीतील अनेक मान्यवरांनी दिलेले आशीर्वाद, पाठिंबा यामुळेच इथवर पोचलो आहोत.

9594961865